“श्री निळकंठेश्वर साखर कारखाना, किल्लारी” नावाने नवा इतिहास! – अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वात ऐतिहासिक ठरावांना मंजुरी

औसा – शहीद जवान व मयत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करून सुरू झालेल्या विशेष बैठकीत किल्लारी साखर कारखान्याच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या या सभेमध्ये एकूण १० विषयांवर चर्चा होऊन सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.आमदार अभिमन्यू पवार यांनी मांडलेला नववा विषय सर्वात चर्चेचा ठरला. या ठरावानुसार, किल्लारी साखर कारखान्याचे नाव बदलून आता “श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना, किल्लारी” असे करण्यात आले आहे. या नव्या नावाला सर्वानुमते मंजुरी मिळाली.
आमदार अभिमन्यू पवार यांनी सर्व सभासदांचे आभार मानले आणि स्पष्ट सांगितले की,निळकंठेश्वराच्या साक्षीने हा कारखाना उभा राहिला आहे. अडचणी आल्या पण त्यावर मात केली.ते पुढे म्हणाले, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा कारखाना शेतकऱ्यांच्या संकल्पाने पुन्हा उभा राहतो आहे.बि.बि. ठोबरे यांचें मोलाचे मार्गदर्शन, तसेच फडणीस यांचे तांत्रिक योगदान यांचे त्यांनी विशेष उल्लेख करून आभार मानले.गतवर्षी कारखाना अडचणीमुळे बंद ठेवावा लागला होता. त्या वेळी ऊस संत शिरोमणी कारखान्याकडे वळवण्यात आला.या वर्षी ३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे लक्ष्य असून, कोणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही आमदारांनी दिली.हा कारखाना माझ्यासाठी केवळ उद्योग नाही, तर भावनिक नातं आहे. अनेक अडचणींवर मात करत तो पुन्हा उभा राहिला आहे. यापुढे आपल्या भागातीलच तरुणांना रोजगार देण्यास प्राधान्य दिलं जाईल, अशी ग्वाही आमदार पवार यांनी सभासदांसमोर दिली.देवेंद्र फडणवीस यांच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे हा कारखाना शेतकऱ्यांच्या हातात राहिला. अन्यथा तो प्रायव्हेट लिमिटेड म्हणून विकला गेला असता.आमदार पवार यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा करत सांगितले की, “किल्लारी लवकरच नगरपंचायत होणार आहे. हे गाव आता तालुक्याच्या दर्जाचं दिसलं पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुकाराम पवार यांनी विषयपत्रिका वाचून दाखवली. सभासदांनी प्रत्येक मुद्द्याचे स्वागत टाळ्यांच्या गजरात करत संमती दर्शवली.जिल्हा उपनिबंधक समृध्द जाधव यांनी कारखान्याच्या कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन केले.पि.आर. फडणीस यांनी सांगितले की, कारखान्याची गाळप क्षमता १२५० टीसीडीवरून थेट २५०० टीसीडी करण्यात आली आहे. आजघडीला ८०% काम पूर्ण असून, १५ ऑक्टोबरपासून ट्रायल गाळप सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी काकासाहेब मोरे, सुरेश पवार, प्रकाश पाटील, अमर बिराजदार यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.डि एल पतंगे, काकासाहेब मोरे, सुभाष फडणीस, समृद्ध जाधव, चंद्रशेखर सोनवणे, अँड परिक्षीत पवार,टी एन पवार, सुभाष जाधव, प्रकाश पाटील,राम पाटील, गोविंद भोसले, युवराज बिराजदार आदींसह सर्व खातेप्रमुख शेतकरी,सभासद उपस्थित होते.
……………
शेवटचा निर्धार – “आपला ऊस किल्लारीला!” आमदार अभिमन्यू पवार यांनी ठामपणे सांगितले,
“इतर कोणत्याही साखर कारखान्याच्या तुलनेत एक रुपयाही कमी दिला जाणार नाही. कारखाना बंद पडणार नाही. हा आपला कारखाना आहे, आणि तो आता थांबवणार नाही.ही विशेष सभा विश्वास, विकास आणि नवसंजीवनीचा संदेश घेऊन संपन्न झाली. श्री निळकंठेश्वराच्या कृपाशीर्वादाने किल्लारी साखर कारखाना आता नव्या जोमात आणि नव्या नावासह पुढे जाण्यास सज्ज आहे.