नागपूर, 27 डिसेंबर : हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्तारावरून जोरदार टोलेबाजी केली आहे. विधानसभेत केलेल्या भाषणात अजित पवारांनी अमृता फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन आणि भरत गोगावले यांचं नाव घेऊन तुफान फटकेबाजी केली.
दादा घेणार वहिनींची भेट
‘देवेंद्रजींकडे 6 खाती आहेत ना, अजून तुमच्या खात्यांचा भार त्यांच्या खांद्यावर कशाला टाकता? 6 पालकमंत्री पदं त्यांच्याकडे आहेत. ते कतृत्ववान आहेत, पण त्यांनी 6 पालकमंत्री वेगळे नेमले तर काम जास्त होणार नाही? भाजपलाही महिलांची मतं मिळाली. 6 महिन्यात अजून एक महिला सापडेना मंत्री करायला? हा कुठला कारभार आहे? मी आता येऊन वहिनींनाच सांगणार आहे, जरा बघा यांच्याकडे रात्री. त्यांनी मनावर घेतलं तर लगेच एखादी महिला मंत्री होईल. मला खात्री आहे’, असा टोला अजित पवारांनी हाणला.
‘देवेंद्रजींना काही विचारलं तर मुख्यमंत्र्यांची संमती आणा म्हणतात, मुख्यमंत्र्यांना विचारलं तर म्हणतात देवेंद्रनी सांगितलं की मी केलं, नुसती टोलवाटोलवी सुरू आहे. दादांची मला इतकी आठवण येते. तुमच्यासारखी व्यक्ती असती तर अशी टोलवाटोलवी झाली नसती. आमचा कोल्हापूरचा ढाण्या वाघ, पण त्यांना एक-दोन साधे डिपार्टमेंट दिले आहेत आणि बाजूला ठेवलं आहे आणि स्वत: सहा-सहा महत्त्वाची डिपार्टमेंट घेतली आहेत. या पद्धतीचं राजकारण करता बरोबर नाही. तुम्हाला या लोकांचा तळतळाट लागेल’, असं अजित पवार म्हणाले.