महापुरूषांचे पुतळे लावण्यासाठी रीतसर परवानगी
बंधनकारक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, : “राज्यातील कोणत्याही गावात किंवा शहरात राष्ट्रपुरूष किंवा थोर व्यक्ती यांचे पुतळे उभारण्यास रीतसर पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे”, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
राजापूर, ता. येवला येथील गावातील चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन केल्याबद्दल गुन्हे दाखल केल्याबाबत सदस्य नरेंद्र दराडे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना मांडली होती.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले, “कोणत्याही शहरात किंवा गावात थोर महापुरूषांचे पुतळे स्थापन करण्यास मनाई नाही. मात्र पुतळा बसविण्यासाठी रीतसर पूर्व परवानगी घ्यावी लागते. याबाबत शासनाने पुतळा बसविण्याविषयी कार्यपद्धती आणि मार्गदर्शक तत्वे विहित केली आहेत. राजापूर-ममदापूर चौफुली येथे ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये काही व्यक्तींनी परवानगी न घेता आणि विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा स्थापन केला होता. यामुळे या तरूणांवर आदेशाचा भंग केल्याने गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य जयंत पाटील यांनी सहभाग घेतला होता.