अतिवृष्टीग्रस्त व पुरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क माफ करावे -ठाकरे सेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी
लातूर :-अतिवृष्टीग्रस्त व पुरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क माफ करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती तथा जिल्हाप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे लातूर जिल्हयासह मराठवाडा तसेच राज्यातील काही जिल्हयात गेले काही दिवस सतत ढगफुटीसदृश्य मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अतिवृष्टी होऊन नद्या, नाले, ओढयांना महापुर येऊन सर्वच शेतीपिकांचे, फळबागांचे व पशुधनांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावला आहे. तसेच महापुराने नदी, नाले व ओढया काठच्या जमिनी खरडुन जाऊन अतोनात नुकसान होऊन गावची गावे पाण्यात गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. शेतकरी व सामान्य जनता प्रचंड अडचणीत आले आहेत.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता १० वी) च्या परिक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर असुन उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता १२ वी) च्या परिक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे. तसेच तरी शासनाने लातूर जिल्हयासह मराठवाडा तसेच राज्यातील पुरग्रस्त भागातील फेब्रवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी माध्यमिक शालांत परिक्षांचे आणि इयत्ता १२ वी उच्च माध्यमिक शालांत परिक्षांचे शुल्क माफ करून नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या पालकांना व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे