कामगारांच्या वेदनांनी काळीज पिळवटून टाकणारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील सत्य घटनेवर आधारित एक अलौकिक नाट्यकृती *”ईम्युनिटी-दि व्हाईस ऑफ टॉलरेंन्स”*

मुंबई, चर्नीरोड (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे) साहित्य संघ मंदिर नाट्यगृह, चर्नीरोड या ठिकाणी मौर्या प्रतिष्ठान आयोजित, डॉ.सोमनाथ सोलवलकर लिखित, महेंद्र दिवेकर दिग्दर्शित “ईम्युनिटी-दि व्हाईस ऑफ टॉलरेंन्स” हा सत्य घटनेवर आधारित एक उत्कृष्ट नाट्यप्रयोग प्रेक्षकांच्या प्रचंड उत्साहात पार पडला. या नाटकाचे लेखक “डॉ.सोमनाथ सोलवलकर” यांच्या उत्कृष्ट लेखणीतून साकारलेली ही नाट्यकृती आज खऱ्या अर्थाने अनुभवायला मिळाली. आणि त्याच ताकदीने नाट्याची जाण असलेले अनुभवी नाट्य अभिनेते आणि दिग्दर्शक महेंद्र दिवेकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण दिग्दर्शनातुन रंगमंचावर साकारलेली प्रत्येक व्यक्तिरेखेच्या प्रसंगनिष्ठ भावनेने रेखाटलेले हुबेहूब असे भीषण चित्रण या कलाकृतीची याची दाद द्यावी तेवढी कमीच आहे. “ईम्युनिटी-दि व्हाईस ऑफ टॉलरेंन्स” या नाटकाचा विषय व त्यातील असलेले गांभिर्य हे केवळ आणि केवळ आजच्या बदलत्या संस्कृतीमधल्या बड्या बापजाद्या बिल्डर्संना/व्यावसायिकांना मोठ्याल्या व्यावसायांमधून मिळणा-या भरमसाठ श्रीमंतीच्या हव्यासापायी दिवसाच्या २००-३०० रुपयाच्या मजूरीसाठी राब राब राबवणा-या बिचा-या सामान्य कामगारांच्या दैनंदिन गरजेच्या व्यथा ह्या कोविड सारख्या भयानक महामारीमध्ये सुद्धा ह्यांना न कळाव्यात एवढे खेदजनक असल्याचे भासते. कारण या कोविड-१९ साथीच्या काळात अनेक कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे कारखाने आणि कामाची ठिकाणे बंद पडल्याने लाखो स्थलांतरित कामगारांना उत्पन्नाचे नुकसान, अन्नटंचाई आणि त्यांच्या भविष्याबद्दल अनिश्चिततेचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत आपल्या उपजिवेकेसाठी कोणत्याही वाहतूकीचे साधन नसताना रात्रंदिवस चालून प्रवास करुन मुळ गावी जायचे स्वप्न पाहणा-या या कामगारांचा अचानक रेल्वेच्या मालगाडीच्या अपघातात मृत्यू होणे ही बाब मनाला चटका देणारी होती आणि याचे प्रसंग वर्णन चित्रण हे दिग्दर्शकाने उत्तम रीत्या मांडले आहे . मुळात या नाटकातील सर्व कलाकारांनी समजून उमजून आणि अतिशय उत्कृष्ठ पद्धतीने केलेल्या उत्तम अभिनयाला नक्कीच यश आलं आणि पुढे देखील येईलच असं एक प्रेक्षक म्हणून मला वाटतं, कारण कोणत्याही नाटकाची जमेची बाजू म्हणजे त्या नाटकाचा ज्वलंत विषय व त्या ज्वलंत विषयाला तेवढ्याच ताकदिने धगधगीत ऊर्जा देणा-या नाटकातील पात्रांची योग्य निवड, या नाटकातील पात्रांची निवड अतिशय समर्पक अशी झाली होती की, कारण या नाटकाच्या विषयाचा असलेला पोत आणि त्यातील विषयाचं असलेलं गांभिर्य हे ठळकपणे मांडण्याची जबाबदारी ही निवडलेल्या प्रत्येक कलावंतांची असते, तिच जबाबदारी योग्य व टोकदार नजाकतीने व भावभावनांच्या हिंदोळ्यावर झुलणा-या पाळण्याप्रमाणे ठोसपणे मांडण्याचा प्रयत्न आजच्या नाट्यप्रयोगातील प्रत्येक पात्रांनी अगदी जीव ओतून केला असं म्हणने वावगे ठरणार नाही. या नाटकालीत मुख्य पात्र असं कुणीच न्वहतं. सगळीच पात्र जशास तशा तोडीची होती पण तरीही मला भावलेले पहिले पात्र “कम्मो” म्हणजेच समृद्धी हीने आपल्या अभिनयाच्या प्रत्येक छटा अगदी सहजपणे व सुंदररित्या प्रेक्षकांपर्यंत प्रामाणिकपणे पोहचविल्या. उत्तम शब्द फेक, उत्तम संवाद, शब्दातील छोटे छोटे बारकावे तसेच अभिनयातील चढ उतार, भाषा शैली, रंगमंचावरील सहज वावर हे अगदी जवळून पाहता आले. दुसरे पात्र म्हणजे “शिवा” ह्याने त्याच्या अभिनयानाच्या सुंदर मनपटलावर प्रत्येक प्रेक्षकांची मने जिंकली हे नक्कीच. तिसरे पात्र “चंपक चाचा” म्हणजेच स्वत: या नाटकाचे दिग्दर्शक महेंद्र दिवेकर, खरं तर हे म्हणजे अभिनयाचा एक आगळा वेगळा रंगमंच तर आहेतच पण त्याचबरोबर माणूस म्हणून उत्तम आणि दिलदार असं व्यक्तिमत्व (ज्यांची अभिनय शैली पहिल्यांदाच अनुभवता आली). त्यांनी साकारलेली चंपच चाच्यांची अभिनय रंगसंगती अगदी काळीज पिळवटून टाकणारी होती. चौथे पात्र “मुकादम” म्हणजेच बुद्धम धाईंजे यांनी आपल्या अभिनयाचे प्रत्येक पैलु समजून उमजून व अत्यंत जाणीपूर्व तसेच बारकाईने अगदी सुंदररित्या उत्कृष्ठपणे प्रेक्षकांसमोर सादर केले. पाचवे पात्र “सलिल चाचा” म्हणजेच नाना कांबळे यांच्याबद्दल लिहिण्यासाठी शब्द अपुरे पडतील, कारण हे व्यक्तिमत्व कोणत्याही मानधनाची अपेक्षा न करता कोणतीही भूमिका अगदी मनापासून व हक्काने साकारताना मी जवळून पाहिलेले आहे. आज पुन्हा त्याचा अनुभव आला त्यांच्या अभिनयातली सहजता अत्यंत लाजवाब होती यात तीळ मात्र शंका नाही. नाटकातील दोन्ही बाल कलाकारांच्या अभिनयाने नाटकाची ऊंची अधिकच वाढली असे मी म्हणेन. त्याचबरोबर प्रकाशयोजनाकार श्याम चव्हाण यांनी आजच्या नाट्यप्रयोगात दिलेली प्रकाशयोजना कोरोना महामारीच्या प्रवासादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या त्या सर्व कामगारांच्या वेदनादायी व्यथा रंगमंचावरील चंद्राच्या साक्षीत पाण्याच्या लखलखत्या प्रत्येक थेंबातून नाटकाचे संगितकार महेंद्र मांजरेकर यांच्या संगितातून जाणवत होत्या. शेवटी एवढच म्हणेन की, ज्यांनी ज्यांनी या नाटकात रंगभूमीवर व रंगभूमीच्या मागे मोलाचे योगदान दिले त्या सर्वांमुळे आजचा नाट्यप्रयोग अतिशय सुंदर झाल्याचे माझ्यासारख्या अनेक प्रेक्षकांचे मत आहे हे मी ठामपणे सांगू ईच्छितो. खरं पाहता वयाच्या 12 वर्षांपासून कलाक्षेत्रात खडतर प्रवास करणारे प्रतिभावान दिग्दर्शक महेंद्र दिवेकर यांनी या नाटकातील प्रत्येक प्रसंग आपल्या कल्पक आणि तल्लख बुद्धीने जिवंत केला आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही एकंदरीत सर्व कलावंतांनी आपल्या बहारदार अभिनयाने आपली इम्युनिटी वापरून जान आणली आहे.