शेतकऱ्यांची ई पीक पाहणी अट रद्द करावी राज्य बाजार समिती उपसभापती संतोष सोमवंशी
लातूर :-शेतकऱ्यांची ई पीक पाहणीची अट रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. आधीच अतिवृष्टीने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आता ई-पीक पाहणीची जाचक अट मारत आहे. शेतात जाण्यासाठी रस्तेच नसल्याने शेतकऱ्यांनी शेतात जाऊन ई-पीक पाहणी कशी करावी हा मोठा प्रश्न पडला आहे. काही ठिकाणी रस्तेच वाहून गेले आहेत, तर काहींना जाण्यासाठी नदी नाले ओलांडून जावे लागत आहे.
बऱ्याच शेतकऱ्यांनी जीव धोक्यात घालून पिकात जाऊन केलेल्या ई-पीक पाहणीचा ओटीपीच येत नसल्याने मोठी डोकेदुखी होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली आहे त्यालाच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत मिळणार तसेच हमी भावाने शेती माल खरेदी करण्यासाठी ही अट असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अतिवृष्टीत मार खाल्लेला शेतकरी आता जाचक अटीत मरण पावत आहे. ३० सप्टेंबर ही पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. येणाऱ्या दोन-चार दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभाग व हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ई-पीक पाहणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे ही अटच रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती तथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी केली आहे
