अतिवृष्टीने बाधीत शेतक-यांसाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा- जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांची सरकारकडे मागणी
लातूर :– सध्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून अशा अडचणीच्या काळात राज्यसरकारने नुकसानग्रस्त शेतक-यांचे हित डोळ्यासमोर ठेवून सकारात्मक दृष्टीकोन बाळगून एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सरकारकडे मागणी केली आहे.आज दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी लातूर ग्रामीण मधील जेवळी, टाकळी ब. नागझरी,रेणापुर तालूक्यातील आरजखेडा, दर्जीबोरगाव, ब्रम्हवाडी येथील अतिवृष्टीमुळे बाधीत क्षेत्राची पाहणी करून प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.अडचणीच्या या काळात आम्ही खंबीरपणे शेतक-यांसोबत असून जो पर्यंत शेतक-यांना सरकार कडून आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत असे सांगितले.अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात झालेले नुकसान हे अतोनात असून सरकारने याकडे सकारात्मक दृष्टीने पहायला हवे. सोयाबीन, ऊस, फळबागा व अन्य पिके यासोबतच पशुधनाचे झालेले नुकसान हे अतोनात असून सरकारने या परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीने पहायला हवे. सरकारला खरंच शेतक-यां विषयी आस्था असेल तर मराठवाड्यात मदती संदर्भात मंत्रीमंडळाची बैठक घेवून वेळप्रसंगी एक दिवसाचे विशेष अधिवेशन घ्यायला हवे अशी देखील मागणी त्यांनी केली.
दसरा व दीपावलीचा सण कांही दिवसांवर आला असून हे सण कसे साजरे करावेत हा मोठा प्रश्न शेतक-यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने निकषांची बाब बाजूला ठेवून सरसकट भरीव आर्थिक मदत व कर्जमाफी जाहीर करून आपले दायित्व पारपाडायला हवे असे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सांगितले.
