आय लव्ह मोहम्मद लिहिलेले पोस्टर वरून कानपुर पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीचा निषेध मोर्चा….
निलंगा ;- उत्तर प्रदेशातील कानपूर व शहाजानपूर येथे घडलेल्या धर्मभावना दुखावणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ, निलंगा येथे समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवारी दि. 26 सप्टेंबर रोजी भव्य व शांततामय निषेध मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू होऊन उपविभागीय अधिकारी कार्यालया येथे समारोप झाला. यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून, पूर्णतः शांततेच्या मार्गाने आपली श्रद्धा आणि निषेध व्यक्त केरून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आला.
कानपूर येथील “आय लव्ह मोहम्मद” फलक प्रकरणात काही युवकांनी श्रद्धेने प्रेरित होऊन सार्वजनिक ठिकाणी फलक लावला होता. हा फलक पूर्णतः शांततामय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चौकटीत असतानाही त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. ही कृती संविधानातील धर्मस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्पष्ट भंग आहे. शहाजानपूर येथे एका व्यक्तीने प्रेषित हजरत मोहम्मद (स.अ.व.) यांच्याविरोधात अत्यंत द्वेषपूर्ण व अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या प्रकारची विधाने केवळ धार्मिक भावना दुखावणारी नसून, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेलाही धोका निर्माण करणारी आहेत.
अहमदनगर येथील रामगिरी नावाच्या व्यक्तीनेही हजरत मोहम्मद (स.अ.) यांच्याविरोधात अश्लील आणि खोट्या स्वरूपाची विधाने करून मुस्लिम समाजाचा अपमान केला. त्याच्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे अशा प्रवृत्ती अधिक बळावल्या आहेत. तसेच महाराष्ट्रातील काही आमदार आणि नेत्यांनी वारंवार मुस्लिम समाजाबद्दल द्वेषमूलक भाष्य केल्यामुळे राज्यात धार्मिक तणाव वाढत आहे. यामध्ये नितेश राणे, संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांच्या विधानांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ आणि कठोर कारवाई करावी, अशी समाजाची मागणी आहे.
या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सामाजिक, धार्मिक व युवक नेत्यांनी आपल्या भाषणांमधून सांगितले की, मुस्लिम समाज शांततेच्या मार्गाने, कायद्याच्या चौकटीत राहून आपले म्हणणे मांडत आहे. श्रद्धेचा आणि धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही आणि न्याय मिळेपर्यंत संविधानिक मार्गाने संघर्ष सुरू राहील. हा निषेध केवळ भावना व्यक्त करण्यापुरता मर्यादित नसून, तो सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याचे एक सकारात्मक उदाहरण ठरावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. सदरील निवेदन हे उपविभागीय अधिकारी निलंगा मार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना देण्यात आला. या निवेदनात सर्व मागण्या स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या असून, या गंभीर घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी हजारोच्या संख्येने मुस्लिम समाज बांधव सहभागी झाले होते.
