ईपीक पाहणीसाठी मुदतवाढ मिळावी अशी सरकारकडे मागणी माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडून
अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी; तात्काळ पंचनाम्याचे निर्देश
लातूर प्रतिनीधी : गुरुवार, २३ सप्टेंबर २५
शासकीय मदत किंवा लाभ मिळण्यासाठी अनिवार्य केलेली ईपीक पाहणी करण्यात
सध्या अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि इंटरनेट नेटवर्कची उपलब्धता नसणे अशा अनेक
अडचणी येत आहेत. त्यामुळे ईपीक पाहणीसाठी मुदतवाढ मिळावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी
होत आहे. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाने ईपीक पाहणीसाठी ३० सप्टेंबर
ऐवजी ३१ ऑक्टोबर अखेरपर्यंत एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी सरकारकडे मागणी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच लातूर जिल्ह्याचे माजी
पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली.
आज, गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी लातूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या
शेतपिकांची पाहणी केली त्यांनी महापूर आणि हरंगुळ (बु.) येथील नुकसानग्रस्त भागाला भेट
देऊन पाहणी केली, शेतकऱ्यांचे म्हणणे एकुण घेतले. या झालेल्या नुकसानीचे संबंधितांना
तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

अतिवृष्टीमुळे ई-पीक पाहणीला मुदतवाढ देण्याची मागणी
सातत्याने सुरू असलेल्या अतिवृष्टी, पूर आणि चिखलामुळे शेतात प्रत्यक्ष जाऊन ई-पीक
पाहणी करणे शेतकऱ्यांसाठी अशक्य झाले आहे. या परिस्थितीत ३० सप्टेंबरपर्यंत ई-पीक
पाहणी पूर्ण होणे शक्य नसल्याने, त्यासाठी ऑक्टोबर अखेरपर्यंत एक महिन्याची मुदतवाढ
द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे.
मागच्या महिन्याभरापासून लातूर जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होत आहे. यामुळे अनेक
भागांत शेतात जाणे शक्य होत नाही. वादळ, वारे आणि विजेच्या उपलब्धतेअभावी ग्रामीण
भागात इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली आहे, ज्यामुळे नेटवर्कअभावी ई-पीक पाहणी करणे
कठीण झाले आहे. या व्यतिरिक्त, भूमी अभिलेख विभागाकडून नकाशे व्यवस्थित अपलोड न
झाल्याने किंवा सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची जमीन दुसऱ्याच ठिकाणी
दाखवली जात आहे. अशा अनेक तांत्रिक आणि नैसर्गिक अडचणींमुळे शासकीय मदत किंवा
लाभ मिळवण्यासाठी अनिवार्य असलेली ई-पीक पाहणी पूर्ण होऊ शकत नाही. या सर्व बाबी
लक्षात घेता, शासनाने ई-पीक पाहणीसाठी एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, जेणेकरून शेतकरी
वेळेत त्यांची पाहणी पूर्ण करू शकतील अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव
देशमुख यांनी केली आहे.
महापूर येथे ऊस पिकाची पाहणी:
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी प्रारंभी महापूर येथील शेतकरी
ओम माने यांच्या शेतात जाऊन अतिवृष्टीने बाधित झालेल्या ऊस पिकाची पाहणी केली.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. सतत पाऊस पडत आहे, नदीला पुर
येत आहे. अशा कठीण काळात बंधाऱ्यांच्या गेट उघडण्यात अडचण येत आहे. यामुळे बंधाऱ्यांचे
पाणी शेतात जाऊन नुकसान होत आहे. या अनुषंगाने महापूर येथील साई बंधाऱ्याला (बरेज)
भेट देऊन बंद असलेले एक गेट तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाच्या
अधिकाऱ्यांना दिले.
हरंगुळ (बु.) येथे सोयाबीनचे नुकसान:
त्यानंतर, त्यांनी हरंगुळ (बु.) येथील शेतकरी भारत मल्लीकार्जून उटगे यांच्या शेतात
जाऊन सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. या ठिकाणीही त्यांनी संबंधित प्रशासकीय
अधिकाऱ्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.
या पाहणी दौऱ्यावेळी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे,
जलसंपदा विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत स्वामी, मंडळ अधिकारी महेश हिप्परगे, लातूर
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव समद
पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे
अध्यक्ष सुभाष घोडके, महापूरच्या सरपंच कल्पना संदिप माने, उपसरपंच विजय चव्हाण,
महावितरणचे कनिष्ठ अभियंता आळंगे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी, शेतकरी आणि
नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—