जिल्हा बँकेची बांधिलकी व सेवाभाव जोपासून लातूर जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान
माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे प्रतिपादन
लातूरला सहकार भवन लवकरच-सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांची माहिती
लातूर ;- कधीकाळी अवसायनात निघालेली लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक आज यशाच्या शिखरावर असून आजपर्यंतच्या वाटचालीत शेतकऱ्यांप्रति बांधिलकी व सेवाभाव जोपासून लातूर जिल्ह्याच्या विकासात मोलाची योगदान लातूर जिल्हा बँकेने दिले आहे. असे प्रतिपादन माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 42 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
यावेळी राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक नामदार बाबासाहेब पाटील, बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, ज्येष्ठ संचालक अशोकराव निलंगेकर, राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील, बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, बाजार समिती सभापती जगदीश बावणे, मांजराचे व्हाईस चेअरमन अशोकराव काळे, रेणाचे चेअरमन अनंतराव देशमुख, व्हा चेअरमन प्रवीण पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अभय साळुंके, मजूर फेडरेशनचे चेअरमन जगन्नाथ पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष किरण जाधव, धनंजय देशमुख, गणपतराव बाजुळगे, शीलाताई पाटील, अशोक गोविंदपुरकर, नारायण लोखंडे, उदयसिंह देशमुख मोईज शेख, संत शिरोमणीचे चेअरमन शाम भोसले, व्हाइस चेअरमन सचिन पाटील, विजयकुमार पाटील, बाबासाहेब गायकवाड, स्वयंप्रभा पाटील, राजकुमार पाटील, मारुती पांडे,अनुप शेळके, दिलीप पाटील नागराळकर, व्यंकटराव पाटील, श्रीमती भोसले ताई सौ सपना किसवे,सौ अनिता केंद्रे, पृथ्वीराज शिरसाठ, एन आर पाटील, सुनिल कोचेटा कार्यकारी संचालक एच जे जाधव,बी व्ही मोरे, पंडित देसाई, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना २५ टक्के दिवाळी बोनस जाहिर
पुढे बोलताना सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब म्हणाले की, शेतकरी, महिला, विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी बँकेने नवनवीन योजना आखल्या व त्याची अंमलबजावणी योग्य प्रमाणे केली त्यामुळे देशभरात बँकेचा लौकिक झाला. इतर ठिकाणी कोठेही नाहीत अशा योजना निर्माण करून लातूर जिल्हा बँकेने सहकार क्षेत्रात आपले वेगळेपण जोपासले आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गाव पातळीपासून आपल्या कार्याची सुरुवात करून राज्याचे मंत्रि म्हणून ते चांगले काम करत आहेत याचा सर्वांना आनंद आहे असे सांगून जिल्हा बँक कर्मचारी गटसचिव यांना दीपावली निमित्त 25% बोनस त्यांनी जाहीर केला तसेच या बोनस पोटी कर्मचाऱ्यांना ११ कोटी ६८ लाख रुपये मिळणार आहेत
लातूर जिल्हा बँक सहकार चळवळीचा आत्मा लातूरला सहकार भवन लवकरच -सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन
लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलेली वाटचाल ही निश्चितच कौतुकास्पद असून ही बँक सहकार चळवळीचा आत्मा आहे अशा शब्दात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लातूर जिल्हा बँकेचा गौरव केला.कितीही काळ बदलत गेला तरी लातूर जिल्हा बँक आपल्या कर्तव्यापासून कधी दूर गेली नाही त्यामुळे या बँकेवर टीका करणा-यांनी बँकेच्या वाटचालीचा बारकाईने अभ्यास करावा असं ते म्हणाले.
लातूर जिल्हा बँकेच्या 42 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले पुढे ते म्हणाले की, जिल्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ समाजातील सर्व घटकांना मिळत असून या योजनांचा लाभ घेऊन अनेक जण यशस्वी जीवन जगत आहेत. समाजातील लोकांचे लातूर जिल्हा बँकेने सामाजिक व आर्थिक स्तर वाढवण्याचे काम सातत्याने केले आहे. लातूर जिल्हा बँकेने प्राप्त केलेले पुरस्कार हे बँकेच्या उत्तम व पारदर्शक वाटचालीचे प्रतीक आहे यापेक्षा काय वेगळा पुरावा टीकाकारांना हवा आहे असं ते म्हणाले.
लातूरमध्ये सहकार भवन निर्माण करण्यासाठी आपण कटिबद्ध असून लवकरच त्याचा निर्णय शासनाकडून जाहीर करण्यात येईल असे सांगून लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख खूप चांगल्या प्रकारे नवनवीन संकल्पना राबवत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग जिल्हा बँकेच्या कामकाजात करत असल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले.
मोठ्या कष्टाने उभारलेल्या संस्था टिकल्या पाहिजेत या भूमिकेतून आपली वाटचाल-जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांचे प्रतिपादन
लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही सहजपणे यशस्वी झाली नसून यामागे अनेकांचे कष्ट आहेत. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना नावारूपाला आलेल्या संस्था टिकल्या पाहिजेत व त्या माध्यमातून शेतकरी सभासदांचा व पर्यायाने लातूर जिल्ह्याचा विकास होत राहिला पाहिजे या भूमिकेतून आपली वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी केले. ते लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 42 व्या वार्षिक सदर साधारण सभेत ते बोलत होते. 42 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सामोरे जात असताना प्रत्येकाला अभिमान वाटावा असे कार्य आजपर्यंतच्या वाटचालीत झाले आहे. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासारखे अभ्यासू व्यक्तिमत्त्व बँकेस संचालक म्हणून लाभल्याने बँकेच्या यशाला गती प्राप्त होत आहे. जीवनात वाटचाल करत असताना प्रत्येकाने मागे वळून पाहिले पाहिजे, जिल्हा बँक कुठे होती व आज कुठे पोहोचली याचा विचार केल्यावर बँकेच्या यशस्वी वाटचालीचे गमक लक्षात येते. शेतकरी हित जोपासत असताना त्यांच्यासाठी बिनव्याजी कर्ज योजना राबवता आल्या याचे समाधान असून जिल्हा बँकेने पीक कर्ज वाटपात घेतलेली आघाडी ही बँकेची शेतकऱ्यांप्रती असलेली बांधिलकी दर्शवते.
जिल्हा बँकेला ९०० कोटींचे उद्दिष्ठ असताना १५५४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप
यावेळी बोलताना बँकेचे चेअरमन धीरज देशमुख म्हणाले की 900 कोटी पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट शासनाकडून दिलेले असताना जिल्हा बँकेने 1554 कोटींचे पीक कर्ज वाटप करून एकूण 154% टक्के एवढे कर्जवाटप लातूर जिल्हा बँकेने केले आहे. लातूर जिल्हा बँकेच्या वाटचालीत विविध कार्यकारी सोसायटी, गट सचिव, कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे.बँकेने ऑनलाईन बँकिंग प्रणाली सुरू करून इतरांपुढे आदर्श निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात देखील जिल्हा बँकेची वाटचाल त्याच पद्धतीने सुरू राहील अशी ग्वाही यावेळी अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी दिली. कार्यकारी संचालक एच जे जाधव यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेतील सर्व विषयांचे वाचन केले त्यास संचालक मंडळाने सुचक व अनुमोदन देवून उपस्थित सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली. सदरील सर्वसाधारण सभेस सभासद व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन सुर्यवंशी व सुनिल पाटील यांनी केले तर आभार उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव यांनी मानले
