पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीमध्ये घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना अटक. चार दिवसाची पोलीस कोठडी
लातूर :- याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 17 ते 18 सप्टेंबर रोजीचे मध्यरात्री 12.45 वाजण्याचे सुमारास पाच नंबर चौक ते औसाकडे जाणारे बायपास रोडने लहुजी साळवे चौक, लातुर येथे गाडीला कट मारण्याच्या कारणावरून क्रुझर गाडीमधून आलेल्या चौघांनी ईरटीका गाडी मधील प्रवाशांसोबत भांडण तक्रारी करून त्यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्याने मारहाण केली त्यातील एकाने हातातील चाकुने ईरटीका गाडी मधील अनमोल केवटे याचेवर वार करुन खुन केला व सहप्रवासी सोनाली भोसले यास जीवे मारण्याचे उद्देशाने चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा क्रमांक 367/25 कलम 103(1), 109(1), 126(2),352,3(5) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नमूद गुन्ह्याच्या घटनास्थळास तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन तपासाबाबत सुचना केल्या त्यानुसार तपासाकरिता पथक नेमण्याबाबत आदेशीत केले. सदरचे आरोपी गुन्हा केल्यानंतर फरार झाले होते. पोलीस अधीक्षक श्री.अमोल तांबे यांनी गुन्ह्यातील फरार आरोपींचा तात्काळ शोध घेण्याचे निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने श्री.मंगेश चव्हाण अपर पोलीस अधीक्षक लातूर, श्री.समीरसिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस ठाणे शिवाजीनगर चे पोलीस निरीक्षक दिलीप सागर, पोलीस ठाणे रेणापूरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे दोन तर पोलीस ठाणे शिवाजीनगर व रेनापुर यांचे प्रत्येकी एक पथक असे एकूण चार पथके तयार करून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून गुन्ह्यातील दोन आरोपीना त्याच दिवशी ताब्यात घेण्यात आले होते. उर्वरित दोन आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे शिवाजीनगर व स्थानिक गुन्हे शाखेचे संयुक्त पथक नमूद आरोपींचा शोध घेत होते. सदरचे आरोपी त्यांच्या राहण्याचे ठिकाण सतत बदलत असल्याने त्यांचा शोध घेण्यात अनेक अडचणी निर्माण होत होत्या. तरीपण सदर पथकांनी शर्तीचे प्रयत्न करून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर उर्वरित दोन आरोपी
1) विष्णु ऊर्फ संदीप शिवाजी मामडगे, वय 28 वर्षे रा-हणुमंतवाडी ता- रेणापुर जिल्हा, लातुर.
2) मंथन चंद्रकांत मामडगे वय 21 वर्षे रा- श्रीराम विद्यालय शाळेसमोर, रेणापुर ता- रेणापुर जिल्हा. लातूर. यांना दिनांक 22/09/2025 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली असून त्यांना आज दिनांक 23/09/2025 रोजी मा.न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने नमूद आरोपींना चार दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे.
गुन्ह्याचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे शिवाजीनगर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिरगे हे करीत आहेत.
