शेतकऱ्यांचा अंत न बघता ओला दुष्काळ जाहीर करा…… काँग्रेस पक्षाचे तहसीलदारांना निवेदन
निलंगा : मागच्या एक महिन्यापासून दररोज मुसळधार पाऊस पडून खरीप हंगामातील पिकांचे पुर्णतः नुकसान झाले आहे. अनेकांची घरे पडली आहेत, घरात पाणी शिरुन अन्नधान्यसह घरातील वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठच्या जमीनी मातीसह खरडून जाऊन त्या नापीक बनल्या आहेत. शेतकरी पुर्णतः खचून गेला असून तात्काळ त्यांना धीर देण्याची आवश्यकता आहे. सरकारने आता शेतकऱ्यांचा अंत न बघता तात्काळ निलंगा, शिरुर अनंतपाळ, देवणी सह संपूर्ण जिल्हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली.
निवेदनात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करुन उपाययोजना राबवाव्यात, मनुष्यहानी झालेल्या कुटुंबाला १० लाख रुपये मदत द्यावी, नुकसान भरपाई म्हणून कोरडवाहू एकरी ५० हजार , बागायती १ लाख व फळबागांना दिड लाख मदत द्यावी, अतिवृष्टीत वाहून गेलेले रस्ते व पूल तात्काळ दुरुस्त करावेत, गतवर्षी फुटलेले मसलगा मध्यम प्रकल्प व हाडगा लघू प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम मार्गी लावावे आदी मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे. दोन दिवसात सरकारने दखल घेतली नाही तर दि २५ सप्टेंबर रोजी निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
निवेदन देताना अजित माने, विजयकुमार पाटील, सुधाकर पाटील, पंकज शेळके, आंबादास जाधव, रमेश मदरसे, विठ्ठल जाधव, हाजी सराफ, किशोर कारखाने, सलीम पठाण, शंकर क्षिरसागर, शकील पटेल, गोविंद सुर्यवंशी, धनाजी चांदूर आदी उपस्थित होते.

काँग्रेसकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी
सततच्या पावसाने नुकसान झालेल्या भागाची काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी शिष्टमंडळासह पाहणी करून शेतकऱ्यांची संवाद साधला. तालुक्यातील झरी, काटेजवळगा, अंबुलगा (बु), बोटकुळ, सावरी, सोनखेड, जामगा या ठिकाणी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस आपल्या सोबत आहे. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून लढा उभारु आपण धीर सोडू नका असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. तत्पूर्वी काटेजवळगा येथील वैजनाथ श्रीपती राजमाने यांच्या घरी भेट देऊन राजमाने कुटुंबाचे सांत्वन करत सरकारने या कुटुंबाला दहा लाख रुपये मदत व तात्काळ घरकुल मंजूर करून द्यावे अशी अशी मागणी साळुंके यांनी प्रशासनाकडे केली. यावेळी डॉ अरविंद भातांब्रे, अजित माने, विजयकुमार पाटील, अॅड नारायण सोमवंशी, बालाजी गोमसाळे, आंबादास जाधव, सुधाकर पाटील, शकील पटेल, विठ्ठल पाटील, पंकज शेळके, अपराजित मरगणे आदी उपस्थित होते……
