मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घ्या ! काँग्रेसचे प्रवक्ते तथा माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी:: ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या
लातूर :: राज्यात प्राथमिक अंदाजानुसार अतिवृष्टीमुळे 26 लाख 3 हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान मराठवाड्यात झाल्याची नोंद आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे, ठिकठिकाणी झालेल्या ढगफुटीमुळे बळीराजा अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे तातडीने मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी व मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट भरीव मदत द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते तथा माजी आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी केली

दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्याला यंदा पावसाने झोडपून काढले आहे. निसर्गाचा हा महाप्रलय आहे. पहिल्यांदाच मराठवाड्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने हाहाकर माजवल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे प्रवक्ते तथा माजी आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे
गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. लातूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड यासह अन्य जिल्ह्यात पूरस्थिती आहे. अनेक गावात पाणी शिरले आहे. शेतकऱ्यांची उभी पीके पाण्यात गेली आहेत. अनेकांच्या शेतात कमरेइतके पाणी पहायला मिळत आहे. त्यामुळे शेतीलाच तलावाचे स्वरूप आले आहे. मराठवाड्यात अनेक भागात पावसाने घातलेल्या या हाहाकारामुळे ऐन सणांच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. याकडे काँग्रेसचे प्रवक्ते तथा माजी आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले आहे
आतापासूनच दीर्घकालीन उपाय आवश्यक :::
मराठवाड्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. पूर ओसरल्यानंतर त्या भागात रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला सतर्क करणे गरजेचे बनले आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घ्यायला हवा. पुरामुळे अनेकांचा संसार वाहून गेला आहे. अशांचा संसार पुन्हा उभा करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. पशुधन, अवजारे, स्प्रिंकलर, पाईप, मोटारी, पत्रे या वस्तूही पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. याबाबतही सरकारने ठोस निर्णय घ्यायला हवा. अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे खरीप हंगाम वाया गेला. आता रब्बी हंगामही गेलाच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभं कसं करता येईल हे सरकारने पाहायला पाहिजे. यंदासारखी अतिवृष्टी मराठवाड्यात पुन्हा झाली तर त्याला तोंड कसं देता येईल, नुकसान कसे टाळता येईल याचाही सरकारने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. म्हणून दीर्घकालीन उपायांसाठी मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात होणे आवश्यक आहे असे काँग्रेसचे प्रवक्ते तथा माजी आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी सांगितले
