महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही, तोपर्यंत हा सीमाभाग केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा, असा ठराव विधानपरिषदेने मंजूर करावा, अशी मागणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
विधानसभा व विधानपरिषदेत एकमताने सीमावादाबाबत असा ठराव मंजूर करून तो केंद्र सरकारला राज्य सरकारने पाठवावा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
ग्रामपंचायती बरखास्त करणार का?
विधानपरिषदेत आज उद्धव ठाकरे यांनी सीमावादावर आपली भूमिका मांडली. यावेळी सीमाभागातील ज्या ग्रामपंचायतींनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे, अशा ग्रामपंचायतींना राज्य सरकार बरखास्त करणार का?, असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.
सीमावादावरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहे. अधिवेशन सोडून त्यांना दिल्लीत जाण्याची गरज काय? दिल्लीत गेले असले तरी सीमाप्रश्नी महाराष्ट्राला या भेटीचा काही फायदा होईल काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, सीमाप्रश्नी आम्ही लाठ्या खाल्ल्या आहेत. तुम्ही आम्हाला सांगणारे कोण? मात्र, सीमावादावरुन मराठी माणसाने आजही लाठ्याच खायच्या काय?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
ठाकरेंकडून सभागृहात पेन ड्राईव्ह
यावेळी उद्धव ठाकरेंनी सभागृहात एक पेन ड्राईव्ह सादर केला. त्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरील ‘केस फॉर जस्टीस’ हा चित्रपट होता. हा चित्रपट सर्वांनी पाहावा. या चित्रपटात कर्नाटकातील मराठी भाषिकांवर कसे अत्याचार केले जातात, हे दाखवले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.