• Tue. Apr 29th, 2025

‘निर्लज्जपणाचा कळस’ म्हणत अजितदादा अब्दुल सत्तारांवर तुटून पडले!

Byjantaadmin

Dec 26, 2022

नागपूर : “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून सातत्याने मंत्री अब्दुल सत्तार वादग्रस्ते वक्तव्ये करतायेत. कधी महिला खासदाराबद्दल (सुप्रिया सुळे) गरळ ओकतात तर कधी जिल्हाधिकाऱ्यांना दारु पिता का? प्रश्न विचारतात. हा निर्लज्जपणाचा कळस आहे कळस…”, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा समाचार घेतला. सिल्लोडमधल्या कृषी कार्यक्रमावरुन बोलताना अजित पवार विधानसभेत कमालीचे आक्रमक झाले होते. त्यांच्या भाषणानंतर विधानसभेत विरोधकांनी सत्तारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कारभारावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. गायराण जमिनीचा घोटाळा आहे. १५० कोटींचा हा घोटाळा आहे. गायराण जमीन कुणाला देता येत नाही. सरकारी जमीन हडपण्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. महसूल राज्य मंत्र्यांनी घेतलेला निर्णय अवैध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले होते. वाशिमला लागून असलेली ३७ एकर जमीन आहे. पदाचा दुरूपयोग करत एका व्यक्तीला फायदा मिळून दिला आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला जावा, अशी मागणी करत असताना अजित पवार कमालीचे आक्रमक झाले होते.

शिंदे फडणवीस सत्तेत आल्यानंतर अब्दुल सत्तार यांची वादग्रस्त वक्तव्ये वाढली आहे. महिला खासदाराविरोधात गरळ ओकण्याचं काम करतात तर कधी जिल्हाधिकाऱ्यांना दारु पिता का प्रश्न विचारतात… अशा वागण्याला काय म्हणायचं… निर्लज्जपणाचा कळस आहे हा…..”, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांचा आक्रमकपणा पाहून समोर बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर अजित पवार यांनी एकही शब्द ऐकून न घेता आपला मोर्चा फडणवीसांकडे वळवला.

“देवेंद्र फडणवीस आपल्याकडून महाराष्ट्राला वेगळ्या अपेक्षा आहेत. अशा मंत्र्यांना पाठिशी घालणं बरोबर नाही. मंत्र्यांच्या अशा वागण्याला खरं तर तुम्हीही तितकेच जबाबदार आहात. कारण असे वादग्रस्त मंत्री तुमच्या सरकारमध्ये सामिल आहेत..”, अशा शब्दात अजित पवार यांनी फडणवीसांना देखील सुनावलं.

भूखंड खावा कुणी गायरान खावा…’ विरोधकांच्या घोषणाबाजीने विधानसभा दणाणली!

अजित पवार यांच्या आक्रमकपणा पाहून विरोधकांना स्फुरण चढलं. अजितदादांचं भाषण संपताच उत्तर द्यायला फडणवीस उभे राहिले. त्याचवेळी विरोधकांनी जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात केली. अब्दुल सत्तार राजीनामा द्या…. अब्दुल सत्तार राजीनामा द्या अशा घोषणांनी विधानसभा दणादूण गेली. ‘भूखंड खावा कुणी गायरान खावा…’ असं भजनच विरोधकांनी वेलमध्ये येऊन गायलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed