लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांची शासनाकडे मागणी
लातूर प्रतिनिधी :
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे प्रचंड
नुकसान झाले असून, यामुळे लातूर जिल्ह्यात ‘ओल्या दुष्काळाची’ स्थिती निर्माण झाली
आहे. या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी शासनाकडे ‘ओला दुष्काळ’
जाहीर करण्याची मागणी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच
लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे.
मागील १५-२० दिवसांपासून लातूर जिल्हा, मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रात
अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच लातूर जिल्ह्याचे माजी
पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज, बुधवार, १७ सप्टेंबर रोजी
खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार धीरज देशमुख
यांच्यासह लातूर जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली.

शासनाकडे भरीव मदतीची मागणी:
लातूर येथील काँग्रेस भवनमध्ये झालेल्या या बैठकीत आमदार अमित विलासराव
देशमुख यांनी जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठीक ठिकाणी जाऊन घेतलेल्या नुकसानीच्या
माहितीचा विस्तृत आढावा घेतला. आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार
अमित देशमुख यांनी शासनाने लातूर जिल्ह्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच
शेतकरी, शेतमजूर आणि आपत्तीग्रस्तांना भरीव मदत देऊन त्यांना धीर द्यावा अशी मागणी
केली. या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सविस्तर
निवेदन देणार असलयाचे सांगीतले.
लातूर जिल्हयातील गंभीर परिस्थितीचा विचार करून, संपूर्ण लातूर जिल्ह्याला ओला
दुष्काळ जाहीर करून सरसकट मदतीच्या उपाययोजना त्वरित राबवाव्यात, वीज पडून किंवा
पुरात वाहून मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत द्यावी, वाहून
गेलेल्या प्रत्येक पशुधनासाठी १ लाख रुपयांची मदत द्यावी, नदीकाठच्या वाहून गेलेल्या
जमिनी शासनाच्या खर्चाने पूर्ववत करून द्याव्यात, नदीकाठी वाहून गेलेल्या पिकांच्या
नुकसानीसाठी प्रति एकर २ लाख रुपयांची मदत द्यावी, फळबागांच्या नुकसानीसाठी प्रति
एकर २ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, बागायती जमिनीसाठी प्रति एकर १ लाख
रुपये तर कोरडवाहू जमिनीसाठी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, वाहून गेलेल्या विद्युत
मोटारी, ट्रॅक्टर आणि शेती अवजारांचे पंचनामे करून त्यांची भरपाई द्यावी, उदगीर
तालुक्यातील बोरगाव या आपत्तीग्रस्त गावाचे तात्काळ पुनर्वसन करावे, या परिस्थितीत
तातडीने लक्ष घालून लातूर जिल्ह्याला संकटातून बाहेर काढावे आदी मागण्या आपण
शासनाकडे करणार आहोत असे सांगीतले. शासनाकडून अपेक्षित मदत मिळेपर्यंत विधिमंडळ
आणि संसदेत पाठपुरावा केला जाईल, प्रसंगी यासाठी आंदोलन करावे लागले तरी ते केले
जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे
अध्यक्ष ॲड. किरण जाधव, ॲड. समद पटेल, माजी जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, सौ. विदया
पाटील, सौ.शिला पाटील, अमर खानापूरे, ॲड.कल्याण पाटील, डॉ. दिनेश नवगिरे, व्हा.
चेअरमन प्रमोद जाधव, प्रवीण पाटील, सर्जेराव मोरे, सुभाष घोडके, विजय देशमुख, एन.आर.
पाटील, दगडूआप्पा मिटकरी, प्रविण सुर्यवंशी, लक्ष्मण कांबळे, विजयकुमार पाटील, नारायण
लोखंडे, गणपतराव बाजुळगे, इम्रान सय्यद, रमाकांत गडदे, फारुख शेख, प्रवीण कांबळे,
मारुती पांडे, सुरेश चव्हाण, अजित माने, सहदेव मस्के, राम स्वामी, कैलास कांबळे, सचिन
सूर्यवंशी, सचिन पाटील, संजय ओव्हाळ आदी उपस्थित होते.
