नाशिक : शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, पीक विमा, पिकाला हमीभाव, लाडक्या बहिणींना 2100 रुपये, कांदा निर्यातबंदी, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान यासह इतर अनेक मागण्यांसाठी आज (15 सप्टेंबर) नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि रोहिणी खडसेंसह मोठे नेते उपस्थित होते. यावेळी मोर्चाला संबोधित करताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
शरद पवार म्हणाले की, आज महाराष्ट्रातील शेतकरी अस्वस्थ आहे. कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी होत आहे. बीडसारखा जिल्हा जिथे अनेकदा दुष्काळ असतो, आज त्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे आणि त्याचा परिणाम शेतीवर झाला आहे. शेतकरी सध्या अस्वस्थ असून त्याचा संसार अडचणीत आला आहे. जीआर काढल्यानंतर देवाभाऊ तुम्ही सर्व महाराष्ट्रात पोस्टर लावले. तुम्ही शिवाजी महाराजांचे दर्शन घेत असल्याचं दाखवलं. परंतु देवाभाऊ शिवाजी महाराजांच्या काळात देखील दुष्काळ पडला होता. त्यावेळी शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना सोन्याची नाणी दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना सोन्याचा नांगर दिला होता आणि त्यांना शेती करता आली होती. आज तुम्ही (देवेंद्र फडणवीस) शिवाजी महाराजांचं नाव घेत आहात आणि बळीराजाकडे ढुंकून पाहत नाही. परंतु आपल्याला बघ्याची भूमिका घेता येणार नाही. आगामी ठराविक दिवसांत तुम्ही जर मदत केली नाही, तर नाशिकचा हा मोर्चास भविष्यात आणखी उग्र रूप घेईल, असा इशारा त्यांनी दिली
शरद पवार म्हणाले की, ग्रामीण भगत 2 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यातील संख्या जास्त आहे. शेतकरी जीव का देतो? कारण संकट काळात त्याच्या पाठीशी कोणीही उभे राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढायला लागल्या आहेत. सरकार दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले असून, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. सरकार लक्ष देत नसल्यामुळे जीव दिलेला बरा, असा विचार शेतकरी करतोय, असे सांगतानाच शरद पवार यांनी ते कृषीमंत्री असतानाच किस्सा सांगितला.
शरद पवार म्हणाले की, कृषीमंत्री असताना एकेदिवशी माझ्या वाचनात आलं की, यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. दुसऱ्या दिवशी मी मनमोहन सिंग याना विनंती केली की, शेतकरी जीव देतोय त्यासाठी आपल्याला दिल्लीत बसून विषय सुटणार नाही, त्यासाठी त्या ठिकाणी जायला हवं. दुसऱ्या दिवशी आम्ही यवतमाळला गेलो. तिथे जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. शेतकऱ्याची बायको रडली. मी तिला विचारलं मालकाने जीव का दिला? तिने सांगितलं कर्ज वाढलं होतं. सोसायटीचं देता आलं नाही आणि सावकाराचं कर्ज काढलं होतं, ते देखील थकलं होतं. त्यानंतर सावकार घरी आला आणि आमच्या अब्रूचा पंचनामा केला. हे त्यांना सहन झालं नाही आणि त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर 10 दिवसांत आम्ही 70 हजार कोटी कर्ज देशात माफ केलं, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

