मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी सध्या मुंबईत राहाते, मात्र ती मुळची उत्तर प्रदेशातील बरेली येथील रहिवासी आहे. गुरुवारी रात्री ३.३० वाजता तिच्या बरेली येथील निवासस्थानी गोळीबार करण्यात आला. मोटारसायकलवर आलेल्या दोन शूटर्सनी दिशाच्या घराबाहेर फायरिंग केले. आता अशी माहिती समोर येत आहे की, शूट आऊटच्या दोन दिवस आधी शूटर दिशा पाटनीच्या निवासस्थान परिसरात येऊन गेले होते. तेव्हा देखील त्यांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात ते यशस्वी होऊ शकले नाही.
उत्तर प्रदेश एसटीएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तिथे असलेल्या ट्रॅफिक पोलिसांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी शूटर आले होते. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुन्हा तपासली. त्यांचे म्हणणे आहे की, शूटआऊटच्या दोन दिवस आधी शूटरला शूटआऊट शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी दोन दिवसानंतर पुन्हा येऊन फायरिंग केले. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पहिल्यावेळी आलेले शूटर कदाचित नवशिके असतील. त्यांना फायरिंग शक्य झाले नाही. त्यामुळे दुसऱ्यावेळी तरबेज शूटर पाठवण्यात आले. मात्र या संबंधीची अधिक माहिती ही तपासांतीच समोर येईल.
सलमान खान हल्ल्यानंतर गँगमध्ये फूट
गुरुवारी शुटाआऊटनंतर रोहित गोदारा आणि गोल्डी बरार या दोघांच्या नावाने दोन जणांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत हल्ल्याची जबाबदारी घेतली. व्हाइस मेसेजही प्रसिद्ध केला. या हल्ल्याचा तपास स्थानिक पोलिसांसोबत उत्तर प्रदेश एसटीएफ देखील करत आहे.
गेल्या वर्षी मुंबईत सलमान खानच्या घरावर फायरिंग झाले होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई, त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई आणि रोहित गोदारा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यांना वाँटेड घोषित केले होते. मात्र नंतरच्या काळात रोहित गोल्डी बरारसह बिश्नोई गँगपासून वेगळा झाला होता. त्याचे कारण असे समोर आले होते की, सलमान खानच्या बंगल्याबाहेर झालेल्या हल्ल्यानंतर काही महिन्यांनी अनमोल बिश्नोईला अमेरिकेत एका स्थानिक प्रकरणात अटक झाली होती. तेव्हा रोहित आणि गोल्डी बरार यांनी ज्या प्रकारे मदत करायला पाहिजे तशी केली नाही, असा लॉरेन्स बिश्नोईचा आरोप होता. दरम्यान, अमेरिकेतील प्रकरणात नंतर अनमोलला जामीन मिळाला होता. मात्र त्याच्या पायात इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग डिव्हाइस लावण्यात आले. त्यामुळे आता अनमोल बिश्नोईच्या नावाने धमकीचे फोन येणे बंद झाले. लॉरेन्श बिश्नोई सध्या साबरमती तुरुंगात आहे.
… गँगची वर्चस्वाची लढाई?
एका अधिकाऱ्याने सांगितले की, माफिया गँगचा इतिहास राहिला आहे की, जेव्हा एखाद्या गँगमध्ये फूट पडते तेव्हा जुन्या गँगमधील गुंड हे आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी एखाद्या बड्या सेलिब्रिटीला टार्गेट करतात. त्यामुळे ते लाइमलाइटमध्ये राहातात. दिशा पाटनीच्या घराबाहेर झालेल्या फायरिंगकडेही याच अँगलने पाहिले जात असल्याची माहिती आहे.

