महिला सक्षमीकरणासह जलसंधारणाची वाटचाल – स्वयंम् शिक्षण प्रयोग संस्थेच्या पुढाकाराने पाणी संवर्धन जनजागृती कार्यशाळा
निलंगा (प्रतिनिधी):- “पाणी वाचवा – जीवन वाचवा” या हाकेला प्रतिसाद देत निलंगा तालुक्यातील स्वयंम् शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने, ॲक्सिस बँक फाउंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या स्वावलंबन प्रकल्पा अंतर्गत आज दिव्यांका मंगल कार्यालय निलंगा येथे पाणी संवर्धन जनजागृती कार्यशाळा उत्साहात पार पडली.या प्रकल्पाअंतर्गत निलंगा तालुक्यातील 100 गावांमध्ये सेंद्रिय शेती, शेतीपूरक व्यवसाय, कौशल्य विकास, व्यवसायिकता आणि पाणी संवर्धन या विषयांवर सातत्याने प्रशिक्षण दिले जाते. या माध्यमातून ग्रामीण महिलांना आत्मनिर्भर बनवून महिला सक्षमीकरणाची नवी दिशा दाखवली जात आहे.45 गावांचा सहभाग झाला असून 575 लोक उपस्थित होते कार्यशाळेत निलंगा तालुक्यातील 45 गावांमधून ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच-उपसरपंच, कृषी सहाय्यक, आदर्श शेतकरी आणि स्वावलंबन सखी अशा 575 लोकांनी सहभाग नोंदविला.ग्रामपंचायत, शासन आणि लोकसहभाग यांच्या साहाय्याने गाव पातळीवर प्रभावी पद्धतीने पाणी संवर्धनाचे कार्य राबविण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.
महिलांच्या स्वावलंबनाचे प्रतीक
कार्यशाळेत अनेक शेतकरी महिलांनी लघु उद्योगातून बनवलेले पापड आणि गृहपयोगी साहित्य विक्रीसाठी आणले होते, यामुळे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाबरोबरच स्थानिक उत्पादन व पोषणमूल्यांना प्रोत्साहन मिळाले. महिलांचा हा सहभाग “शेतातून स्वयंपूर्णतेकडे” या संकल्पनेला उजाळा देणारा ठरला. तज्ज्ञांचे मार्गदर्शन – पाणी संवर्धनाची नवी दिशा कार्यशाळेत उपस्थित तज्ज्ञांनी पाणी संवर्धनासाठी ठोस उपाय सुचवले.श्री. दिलीप बिराजदार(उद्योग निरीक्षक )श्री. राहुल गाडे (महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा व्यवस्थापक) श्री.डॉ. चिलमे सर(पशुधन अधिकारी निलंगा ) श्री सुरवंशी एस व्ही .(पशुधन पर्वक्षेक )धनंजय पवार (जिल्हा संसाधन अधिकारी लातुर)यांनी शासनाच्या योजना व शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग या विषयावर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती संदया गायकवाड यांनी केले. तसेच विशेष म्हणजे प्रवीण राठोड यांनी त्यांच्या शैलीतुन विविध नेते व अभिनेते यांच्या आवाजात पाणी संवर्धनाविषयीचा संदेश दिला. या वेगळ्या शैलीतील प्रस्तुतीमुळे उपस्थित शेतकरी, महिला व ग्रामस्थ यांना जनजागृतीचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचला.कार्यक्रमाचे आयोजन व आभारकार्यक्रमाची प्रस्तावना तथा प्रकल्पाची व संस्थेची ओळख प्रकल्प समन्वयक श्री. दीपक लांडगे यांनी दिली. या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी श्री. पांडुरंग धडे (पाणलोट समन्वयक) , सुनील काळुंके,मनीषा सोनूले,अविनाश कळसे, पवन कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.स्वयंम् शिक्षण प्रयोग ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. महिलांना कौशल्य प्रशिक्षण, लघुउद्योग, शेतीपूरक व्यवसाय व सामाजिक जनजागृती या क्षेत्रांत संधी उपलब्ध करून देऊन त्यांना आत्मनिर्भरतेकडे नेले जात आहे.आजची पाणी संवर्धन कार्यशाळा या ध्येयाशी घट्ट जोडलेली आहे, कारण “पाणी वाचवले तरच समाज व शेती वाचेल आणि शेती वाचली तरच महिलांचे व कुटुंबाचे स्वावलंबन बळकट होईल.”या कार्यशाळेमुळे निलंगा तालुक्यात पाणी संवर्धनाची चळवळ अधिक बळकट झाली असून, महिला सक्षमीकरणासह ग्रामस्थांच्या लोकसहभागातून गावोगावी जलक्रांती घडविण्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
