महाराष्ट्रात मुंबईसारख्या शहरात कधीकाळी ‘अंडरवर्ल्ड’ म्हणजे गुन्हेगारी टोळय़ांचे वर्चस्व होते. त्यांची जागा आता या राजकीय ठग आणि पेंढाऱ्यांनी घेतली आहे व हे ठग-पेंढारी थेट सत्तेतच सामील झाल्यामुळे राज्याचे नैतिक अधःपतन वेगाने सुरू आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
आजच्या सामनाच्या अग्रलेखात उद्धव ठाकरे म्हणाले, नागपूर ‘एनआयटी’चे 110 कोटींचे 16 भूखंड घशात अडकले तरी देवेंद्र फडणवीस हे यातील भ्रष्टाचाऱ्यांना क्लीन चिट देत फिरत आहेत. सत्यवचनी रामाचे नाव घ्यायचे व भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्यांचे भजन गायचे. संघाचे संस्कार ते हेच म्हणावेत काय! नागपूर भूखंड प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एखादी ‘एसआयटी’ नेमली असती तर देवेंद्र फडणवीस यांचे चरित्र उजळून निघाले असते, पण गाडलेले विषय उकरून त्याबाबत ‘एसआयटी’ वगैरे निर्माण केल्या जात आहेत.
बदनाम लोकांना क्लीन चिट
उद्धव ठाकरे म्हणाले, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात खोके सरकारने दोन गोष्टी केल्या. आल्या आल्या आपल्या कंपूतील बदनाम लोकांना ‘क्लीन चिट’ देण्याचे स्वतंत्र मंत्रालय उघडून भ्रष्टाचारावरील सर्व खटले बंद केले किंवा मागे घेतले. यात प्रामुख्याने बँकांचे घोटाळे करणारे, राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबा करून पैशांची अफरातफर करणारे लोक आहेत.
उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, आयएनएस विक्रांत वाचविण्याच्या नावाखाली जनतेकडून, बिल्डरांकडून जाहीर रीतीने पैसे गोळा केले, ते पैसे जेथे पोहोचायचे तेथे पोहोचलेच नाहीत. हा भ्रष्टाचार नाही असे ठरवून सरकारने क्लीन चिट दिली. बँका लुटणाऱ्यांनाही सोडले, कर्जबुडव्यांना सोडले. साधारण पंधराएक लोकांना क्लीन चिट देऊन स्वच्छता अभियान राबवले. या सगळय़ांना आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायचेच काय ते बाकी आहे. नागपूरच्या अधिवेशनात लोकहिताचे, महाराष्ट्र स्वाभिमानाचे खास काही घडले नसले तरी आर्थिक घोटाळे करणाऱ्यांना मोकळे रान देण्याचे निर्णय सरकारने घेतले. ही झुंडशाहीच आहे.
छत्रपती शिवरायांच्या अपमानाचा विषय मागे पडला
उद्धव ठाकरे म्हणाले, नागपुरातील थंडीत या बोक्यांचे व त्यांच्या खोके सरकारचे मेंदू गोठून गेले. भारतीय जनता पक्षाला हवे तेच शेवटी घडले व अधिवेशनात चिखलफेकीस उत्तेजन देऊन छत्रपती शिवरायांच्या अपमानाचा ज्वलंत विषय मागे ढकलण्यात यश मिळवले. शिवरायांवर इतर विषयांनी कुरघोडी केली हे दुर्दैवच म्हणावे लागेल! ठग–पेंढाऱ्यांचेच राज्य आले म्हटल्यावर दुसरे काय व्हायचे? नागपुरात विधानसभेचे हिवाळी अधिवेशन गरमागरमीत सुरू आहे, पण जनतेच्या प्रश्नांवर सगळाच मामला थंड आहे. याचे कारण म्हणजे राज्यात सरकार नसून एका बेकायदेशीर टोळीचे राज्य सुरू आहे.