उच्च क्षमतेचे सक्षन आणि जेटिंग मशीन मनपाच्या ताफ्यात दाखल
लातूर/ प्रतिनिधी: मलवाहिनी, भूमिगत गटार व मल संकलन केंद्राची स्वच्छता करणाऱ्या मनुष्यबळाची आरोग्य सुरक्षितता व पाण्याचा पुनर्वापर करण्याची क्षमता असणारे उच्च क्षमतेचे सक्षन व जेटिंग मशीन मनपाच्या ताफ्यात दाखल झाले आहेत.यंत्र संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई मार्फत अशी २ वाहने लातूर मनापाला प्राप्त झाली असून पालिका आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मानसी यांच्या हस्ते या वाहनाचे बुधवारी (दि. १०) लोकार्पण करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव,उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे, मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख, स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

या नव्या मशीनच्या माध्यमातून मनपा कार्यक्षेत्रात मलवाहिनी, भूमिगत गटार व मल संकलन केंद्रांची स्वच्छता करणे सोयीचे होणार आहे. भूमिगत नाल्यांची ब्लॉक क्रॉसिंग पाईपची स्वच्छता देखील प्रभावीपणे करता येणार आहे. आपत्कालीन काळात अत्यावश्यक ठिकाणी मशीनचा वापर करून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करता येणे शक्य होणार आहे. आपत्कालीन स्थितीत नागरिकांनी मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख (९०११०३२४०४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.