जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना कृषी औजारांसाठी अर्ज करण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
लातूर, (जिमाका) : जिल्हा परिषद, लातूर कृषि विभाग अंतर्गत सन २०२५-२६ मध्ये जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकरी लाभार्थ्यांना कडबाकुट्टी सयंत्र (Chaffcutter), रुंद सरी वरंबा पेरणी यंत्र (Broad Bed Furrow Planter (BBF) व स्लरी फिल्टर (Slurry Filter) खरेदी करण्यासाठी डीबीटी तत्वावर अनुदान देण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत देण्यात आली होती. मात्र शेतकरी लाभार्थ्यांकडून अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्याबाबत मागणी असल्यामुळे कृषीयंत्र या घटकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
जिल्हा परिषद लातूरच्या कृषि विभागाने सन २०२५-२६ या वर्षातील सेस निधीमधून शेतकऱ्यांसाठी कडबाकुट्टी, रुंद सरी वरंबा पेरणी यंत्र आणि स्लरी फिल्टर औजारांसाठी जिल्हा परिषद सेस फंडातून तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा शेतीमधील खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी २९ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. इच्छुक शेतकरी कृषि विभाग, पंचायत समिती कार्यालय येथे अर्ज सादर करू शकतात.
योजनेचे स्वरूप आणि लाभाचे स्वरूप
कडबाकुट्टी
एचपी (HP) कडबाकुट्टी: खरेदी किमतीच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १४ हजार रुपये, यापैकी जी
रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून दिली जाईल.
५एचपी कडबाकुट्टी: खरेदी किमतीच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १७ हजार रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून दिली जाईल.
रुंद सरी वरंबा पेरणी यंत्र: खरेदी किमतीच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त ३२ हजार ५०० रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून दिली जाईल.
स्लरी फिल्टर (टाकीसह): खरेदी किमतीच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त २० हजार रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून दिली जाईल.
अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज पंचायत समिती कार्यालयात किंवा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. हे अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह २२ सप्टेंबर,२०२५ पर्यंत संबंधित पंचायत समितीत कार्यालय येथे जमा करणे अनिवार्य आहे.
आवश्यक कागदपत्रे
विहित नमुन्यातील अर्ज, ७/१२ आणि ८ अ उतारा, अनुसूचित जाती किंवा जमातीच्या लाभार्थ्यांसाठी जातीचा दाखला, रुंद सरी वरंबा पेरणी यंत्रासाठी अर्जदाराच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ट्रॅक्टर असल्याचा पुरावा .
प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पात्र लाभार्थ्यांची ज्येष्ठता सूची तयार केली जाईल या ज्येष्ठता सूचीनुसार पात्र लाभार्थ्यांना पूर्वसंमती दिल्यानंतर विहित मार्गाने लाभार्थ्याने खरेदी करून मोका तपासणी झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात थेट अनुदान (DBT) जमा करण्यात येईल.
जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी दिपक सुपेकर यांनी ग्रामीण भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
संबंधित तालुका पंचायत समिती कार्यालयातील कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषि) किंवा कृषि विभाग, जिल्हा परिषद, लातूर यांच्याशी संपर्क साधावा.
*
