सेवा कार्याचा लातूर पॅटर्न निर्माण करावा शहर जिल्हा भाजपा कार्यशाळेत संघटन मंत्री संजय कौडगे यांचे आवाहन
लातूर प्रतिनिधी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजेच २ ऑक्टोबर यादरम्यान देशभरात भाजपच्या वतीने सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात येत आहे. या सेवा पंधरवाड्यात विविध कार्यक्रम होणार असून यामध्ये सेवा परमो धर्म या विचारांना पुढे नेत शहर जिल्हा भाजपाने सेवाकार्याचा लातूर पॅटर्न निर्माण करावा असे आवाहन मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांनी केले.
सेवा पंधरवाड्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शहर जिल्हा भाजपा पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे बोलत होते. यावेळी माजी पालकमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर, अभियानाच्या प्रदेश सहसंयोजिका प्रेरणा होनराव, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, अर्चना पाटील चाकूरकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांच्यासह अभियानाचे शहर जिल्हा संयोजक अमोल गीते, सहसंयोजक संजय गिर, रविशंकर लवटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सत्ता हे सेवेचे साधन असून सत्तेच्या माध्यमातून सेवाकार्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगत संजय कौडगे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून हे सेवाकार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपच्या वतीने राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजेच १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर यादरम्यान सेवा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात येत आहे. हा सेवा पंधरवाडा लातूर शहर भाजपच्या वतीने अधिक जोमाने आणि उत्साहाने पार पडून या पंधरवड्यात लातूर शहरातील जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचत त्यांना वेगवेगळ्या सेवा देत सेवाकार्याचा लातूर पॅटर्न निर्माण करावा असे आवाहन मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांनी केले.
लातूर भाजपने यापुर्वीही अनेक अभियाने यशस्वी करत या अभियानांमध्ये अधिकाधिक लोकसहभाग करून घेतला असल्याचे सांगत माजी पालकमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ देशातीलच नव्हे तर जगातील लोकप्रिय नेते असल्याचे सांगितले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले सेवा पंधरवाड्याचे अभियान लातूर भाजपने तितकेच लोकप्रिय करून या पंधरवाड्यात या अभियानात आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम यशस्वी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून जनसेवा करण्याची मोठी संधी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपलब्ध झालेली असून या संधीचे सोने करण्यासाठी प्रत्येकांनी अथक परिश्रम करून आपले योगदान द्यावे असे आवाहन केले.
सेवा पंधरवाड्यानिमित्त विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगून अभियानाच्या प्रदेश सहसंयोजिका प्रेरणा होनराव यांनी पक्षाने जे जे कार्यक्रम घेण्यास सांगितले आहेत ते केवळ कार्यक्रम नसून ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. या अभियानादरम्यान स्वच्छता अभियान, वृक्षारोपण (एक पेड मां के नाम), रक्तदान शिबीर, मोदी विकास मॅरेथॉन, दिव्यांग सन्मान, विकसित भारत चित्रकला स्पर्धा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे वितरण, प्रबुद्ध संमेलन आदि उपक्रमांचा समावेश राहणार असल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे ते स्वप्न पुर्ण करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असून याकरिता पंतप्रधान मोदी यांचे मार्गदर्शन आपल्याला तितकेच आवश्यक असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणारे सेवा पंधरवाडा अभियान लातूर शहर भाजपासाठी अतिशय महत्वाचे आहे. या अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्याची संधी प्राप्त होणार असून याचा फायदा आगामी होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे. या अभियानामुळे लोकांची सेवा करण्याची संधी प्राप्त होणार आहे. मात्र त्यांच्याशी संपर्क साधता येणार असून या माध्यमातून निवडणुकीच्या प्रचाराची एक फेरीही आपल्याला पुर्ण करता येणार आहे त्यामुळेच हे सेवा पंधरवाडा अभियान पक्ष पदाधिकाऱ्यांसह माजी व भावी नगरसेवकांसाठी संधी उपलब्ध करून देणारे आहे. या संधीचे सोने करण्यासाठी प्रत्येकाने अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्वोतपरी योगदान द्यावे असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी केले.
या कार्यशाळेत मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांना छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार घोषित झाल्याबद्दल शहर जिल्हा भाजपाच्या वतीने सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या कार्यशाळेचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन महिला मोर्चा अध्यक्षा रागिणी यादव यांनी केले. या कार्यशाळेत सरचिटणीस रवी सुडे, अॅड दिग्विजय काथवटे, मीना भोसले, प्रविण सावंत, युवा मोर्चा अध्यक्ष गणेश गोमचाळे, मंडल अध्यक्ष सुरेश जाधव, निर्मला कांबळे, राहूल भुतडा, रोहित पाटील, विशाल हावा पाटील, सचिन सुरवसे, अजय भुमकर, निखील गायकवाड, मोहसीन शेख, यांच्यासह पक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
