“विकसित भारत” संकल्पना पूर्ण होण्यासाठी युवकांची गरज- डॉ. अशोक महाजन
निलंगा :- देशाच्या विकासामध्ये युवकांचा वाटा मोठा असतो. विविध शाखांमध्ये पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासामध्ये हातभार लावला पाहिजे. पदवीधारकांना पदवी प्राप्त झाली येथूनच त्यांच्या स्पर्धेला खरी सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या युगात पदवीधारकांनी आपल्या क्षमतेचा वापर पूर्णपणे करावा आणि ध्येय साध्य करावे. आपले ध्येय आपली क्षमता ओळखून ठरवा आणि यशस्वी व्हा. संशोधनाकडे अधिक लक्ष द्या “विकसित भारत” ही संकल्पना आपल्याला पूर्ण करायची असेल तर युवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.अशोक महाजन यांनी व्यक्त केले. ते निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालय व महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात बोलत होते. शिक्षणाची जाणीव, शिक्षणाचे महत्त्व खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले पाहिजे. शिक्षणाचा पाया अधिक भक्कम झाला पाहिजे याच विचाराने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांकडे स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी लक्ष दिले होते. एका पिढीने मोठ्या कष्टाने उभे केलेले शैक्षणिक संकुल दुसऱ्या पिढीने मोठ्या ताकतीने पुढे नेले पाहिजे, जे काम श्री.विजय पाटील निलंगेकर करीत आहेत याबद्दल प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांनी समाधान व्यक्त केले.
या पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. विजय पाटील निलंगेकर यांची उपस्थिती होती. आपल्या अध्यक्षीय समारोपात त्यांनी, बदलत्या काळात शिक्षण क्षेत्रात झालेल्या बदलांना डोळ्यासमोर ठेवून अभ्यासक्रम निर्माण झाले पाहिजेत. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, संशोधन क्षेत्रात करताना देशाची आणि समाजाची प्रगती कशी होईल हा विचार करण्याचा सल्ला दिला.
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस अभिवादन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.या आनंदमय पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाप्रसंगी कला, विज्ञान, वाणिज्य, संगणकशास्त्र, व्यवसायिक अभ्यासक्रम, फार्मसी अशा विविध शाखेतील २११ पदवीधारक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.यावेळी विचार मंचावर महाराष्ट्र शिक्षण समितीचे सचिव श्री. बब्रुवानजी सरतापे, महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कर्मवीर कदम, महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर पाटील, उपप्राचार्य डॉ. भास्कर गायकवाड, प्रा.प्रशांत गायकवाड, परीक्षा व मूल्यमापन विभागाचे प्रमुख डॉ. बालाजी गायकवाड, डॉ. चंद्रवदन पांचाळ, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा, सांस्कृतिक या सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक परीक्षा व मूल्यमापन विभागाचे प्रमुख डॉ. बालाजी गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन डॉ.गोविंद शिवशेटे, डॉ.नंदा भालके, प्रा. संदीप सूर्यवंशी, यांनी केले. तर आभार विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख डॉ. हंसराज भोसले यांनी मानले.
