राज्याच्या युवा धोरण समितीत लातूरच्या विधी पळसापुरे यांची वर्णी
लातूर : महाराष्ट्र सरकारने राज्याचे सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी समिती गठीत केली असून या समितीत राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त विशेषतः लातूरच्या कन्या विधी सुभाष पळसापुरे यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे त्या समितीतील सर्वात युवा सदस्य ठरल्या आहेत.
राज्यातील युवकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे समाधान, त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक दिशा आणि शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी युवा धोरण महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या समितीचे कार्य अत्यंत जबाबदारीचे असून युवकांच्या भविष्यास दिशा देणारे आहे. बदलत्या काळातील आव्हानांचा विचार करून शिक्षण, रोजगार, क्रीडा, संस्कृती, सामाजिक सहभाग आणि उद्योजकता यांसारख्या विविध क्षेत्रांत युवा धोरणाचा आराखडा तयार करण्याचे काम ही समिती करणार आहे.
विधी पळसापुरे या मागील पाच वर्षांपासून युवक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाकडून त्यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त झाला आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या संसदेत केलेल्या प्रभावी भाषणाने लाखो लोकांची मने जिंकली होती. त्यामुळे त्यांचा या समितीतील समावेश हा केवळ सन्मानच नव्हे, तर युवकांचा खरा आवाज या समितीत पोहोचेल, अशी खात्री दिलासा देणारी ठरते.
लातूरपासून सुरू झालेला प्रवास थेट दिल्लीपर्यंत पोहचला आणि दिल्लीतून सुरू झालेला प्रवास आज देशभर पसरला आहे. दिसायला सोपा वाटणारा हा प्रवास प्रत्यक्षात मेहनत, संघर्ष आणि जिद्दीने सजलेला आहे. वाचन, लेखन आणि प्रभावी वक्तृत्व यांचा मिलाफ झाल्यावर एखादी व्यक्ती किती उंच भरारी घेऊ शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे विधी पळसापुरे, आपल्या बुलंद आवाजातून संसद गाजवणाऱ्या आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विधीने अगदी कमी वयात राष्ट्रीय युवा पुरस्कार पटकावला. तिच्या कविता, भाषणं आणि लिखाण हे सोशल मीडियावर हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.यश म्हणजे फक्त स्वतःचं करिअर घडवणं नसून, अनेकांना मार्ग दाखवणं, प्रेरणा देणं आणि समाजासाठी काहीतरी घडवणं हेच खरं यश आहे. आणि याच प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजेच महाराष्ट्र सरकारच्या सुधारित युवा धोरण समितीत सर्वात युवा सदस्य म्हणून त्यांची झालेली निवड.गल्लीपासून दिल्लीपर्यंत नाव पोहोचलेली ही तरुणी आता राज्याच्या धोरणनिर्मितीत आपला ठसा उमटवणार आहे. त्यामुळे तिच्या पुढील वाटचालीकडून अजून मोठ्या शिखरांच्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत.
