ओंकार साखर कारखान्याने मोडली मोनोपली; देशात नंबर वन ग्रुप – आमदार संभाजीराव निलंगेकर”
निलंगा :“या भागात ओंकार साखर कारखाना सुरू होण्यापूर्वी अनेक कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सांगत असत – ‘तुझा ऊस आमच्या कारखान्याला द्यायचा असेल तर आमच्या सोबत राहा.’ अशी मोनोपली येथे निर्माण झाली होती. पण ती मोडून काढण्याचे ऐतिहासिक काम ओंकार साखर कारखान्याने केले. आज या कारखान्याचे नाव राज्यातच नाही तर देशात झाले आहे,” असे प्रतिपादन माजी पालकमंत्री व आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.दिनांक ३ सप्टेंबर रोजी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना (लीज ओंकार साखर कारखाना प्रा. लि. युनिट २, अंबुलगा बु.) हंगाम २०२५-२६ चा मिल रोलर पूजन सोहळा आमदार निलंगेकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील, राजवीर पाटील निलंगेकर, चेअरमन दगडू सोळुंके, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवकुमार चिंचमसुरे, नरसिंग बिरादार, गोविंदराव चिलकुरे, सदाशिव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले,
“महाराष्ट्रात साखर उद्योग म्हटला की ठराविक पवार–देशमुख अशीच नावे पुढे येत. परंतु ओंकार साखर ग्रुपने त्या साखर सम्राटांना मागे टाकत तब्बल एक कोटी टन ऊस क्रशिंग करून राज्यातच नव्हे तर देशात नंबर एकचा साखर समूह म्हणून ख्याती कमावली आहे. या कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान, स्वाभिमान वाढला असून त्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती झाली आहे.”कारखाना प्रशासनाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले,“कारखाना आणि शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही. चुकीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते, तेव्हा त्याचा थेट फायदा शेतकरी आणि कारखान्याला होतो.”चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांच्याबाबत आमदार निलंगेकर म्हणाले,“पुढे जाताना त्यांना अनेक अडचणी येतात, परंतु त्यांच्या पाठीशी बळीराजांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे त्यांना कसलीही अडचण येणार नाही. एक टीम आणि एक परिवार म्हणून आपण त्यांच्या खंबीर पाठीशी आहोत. त्यांच्या मेहनतीमुळे आज ते १७ युनिट यशस्वीपणे चालवत आहेत. आपल्या शेजारील कर्नाटकातील भालकी येथेही त्यांचा कारखाना सुरू होत आहे. बाबुराव बोत्रे पाटील यांनी अतिशय कमी कालावधीत साखर उद्योगात गगनभरारी घेतली असून ओंकार साखर समूह देशात नंबर एक झाला आहे. याचे संपूर्ण श्रेय बाबुराव बोत्रे पाटील यांनाच जाते.”जिल्ह्यातील अतिवृष्टी संदर्भात ते म्हणाले,
“निलंगा विधानसभा मतदारसंघातील सर्वच मंडळात सरसकट पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली असून सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे.”चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील म्हणाले,“शेतकऱ्यांच्या आशीर्वादामुळेच ओंकार साखर कारखाना देशात नंबर एक झाला आहे. ही कामगिरी भविष्यातही सुरू ठेवू. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे. निलंगेकर परिवाराने आम्हाला सदैव साथ दिली असून त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही कर्नाटक राज्यातील भालकी येथे आणखी एक नवीन युनिट सुरू करत आहोत.”माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला,
“कमी ऊस लावा पण दर्जेदार लावा. ऊसाच्या टनेजपेक्षा त्याचा दर्जा महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविण्यासाठी हा कारखाना सदैव प्रयत्नशील राहील.”या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे यांनी केले.यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, प्रशांत पाटील, गुंडेराव जाधव, संतोष पाटील, संजय दोरवे, वीरभद्र स्वामी, डॉ. मल्लिकार्जुन संकद, मॅनेजर सतीश मोहेळकर यांच्यासह अनेक ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
