• Sun. Sep 7th, 2025

दयानंद कला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संदीपान जगदाळे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025’ ने सन्मानित

Byjantaadmin

Sep 7, 2025

दयानंद कला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संदीपान जगदाळे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025’ ने सन्मानित_

शिक्षकांचे योगदान भारताला सुपर पॉवर बनवेल – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नवी दिल्ली/लातूर, 5 : शिक्षकांचे समाजातील स्थान सर्वोच्च असून शिक्षक मुलांमध्ये आत्मसन्मान आणि सुरक्षितता जागवतात. त्यांचे यश हेच शिक्षकांचे खरे बक्षीस आहे. राष्ट्रीय शिक्षा धोरण 2020 च्या अंमलबजावणीत शिक्षणाला आनंददायी बनवण्यावर भर देत बालिका शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. “भारताला कौशल्याची राजधानी आणि सुपर पॉवर बनवण्यात शिक्षकांची भूमिका निर्णायक आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी केले.

शिक्षक दिनानिमित्त विज्ञान भवन येथे आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील सहा शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार  प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यामध्ये शालेय शिक्षण क्षेत्रातील डॉ. शेख मोहम्मद वक़िउद्दीन शेख हमीदोद्दीन (जिल्हा परिषद हायस्कूल, अर्धापूर, नांदेड), सोनिया विकास कपूर (एटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल नं. 2, मुंबई) आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील डॉ. संदीपन गुरुनाथ जगदाळे (दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स, लातूर), डॉ. नीलाक्षी जैन (शाह अँन्ड अँकर कच्छी अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई), प्रा. पुरुषोत्तम पवार (एस व्ही पी एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनीअरिंग, बारामती), आणि कौशल्य विकास क्षेत्रातील श्री. अनिल रामदास जिभकाटे (संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर) यांचा समावेश आहे.

शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागातर्फे आयोजित या सोहळ्यात 45 शालेय शिक्षक, 21 उच्च शिक्षण आणि 16 कौशल्य विकास क्षेत्रातील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मजूमदार, जयंत चौधरी, शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे (MSDE) सचिव  देबाश्री मुखर्जी यावेळी उपस्थित होते.या पुरस्काराचा उद्देश शिक्षकांचे समर्पण, नाविन्यपूर्ण कार्यपद्धती आणि विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करणे हा आहे. मागील काही वर्षांपासून या पुरस्काराची व्याप्ती वाढवून उच्च शिक्षण तसेच कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयातील शिक्षकांनाही संधी देण्यात येत आहे.

*दयानंद कला महाविद्यालयाचे प्राध्यापक  डॉ. संदीपन गुरुनाथ जगदाळे यांच्याविषयी संक्षिप्त माहिती*

संगीत विषयाचे प्राध्यापक असलेले डॉ. जगदाळे हे लातूरमधील पहिले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते ठरले. तबलावादक आणि गायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या जगदाळे यांनी गोंड आदिवासी वस्त्यांवर शिक्षण पोहोचवले, एचआयव्ही बाधित व अनाथ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले.अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील संगीत पुस्तक तयार करणे हे त्यांचे विशेष योगदान आहे. कोविड काळात दूरदर्शन, रेडिओ आणि सोशल मीडियाद्वारे त्यांनी लोकगीते व पोवाड्यांच्या माध्यमातून जनजागृती केली. त्यांच्या लिखाणातील 13 संगीतग्रंथ परदेशातही प्रसिद्ध झाले आहेत.या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांना प्रमाणपत्र, रौप्य पदक आणि 50 हजार रुपयांचे रोख बक्षीस प्रदान केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *