समाधानी जीवन जगण्यासाठी शिक्षण क्षेत्र महत्त्वाचे -प्रा. एस. एल. गायकवाड
डॉ. धनंजय जाधव सेवापूर्ती गौरव सोहळा कार्यक्रम

निलंगा:- शिक्षण क्षेत्रातील अध्यापन व संशोधन या कार्यात असलेल्या शिक्षकाला निवृत्तीपर्यंत समाधानी जीवन जगता येते. निवृत्तीनंतर हे समाधान आपले कार्य त्याने तसेच पुढे चालू ठेवले तर त्याला टिकवता येते म्हणून समाधानी जीवन जगण्यासाठी शिक्षण क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे.असे मत माजी उपप्राचार्य प्रा.एस.एल.गायकवाड यांनी व्यक्त केले.
निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. धनंजय जाधव यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या आधी महाराष्ट्र शिक्षण समितीच्या कार्यालयात अध्यक्ष श्री. विजयजी पाटील निलंगेकर यांनी डॉ.धनंजय जाधव यांचा सत्कार करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कर्मवीर कदम यांची उपस्थिती होती. त्यांनी शिक्षकाला जर हसतमुख राहायचे असेल तर त्यांनी जीविका व उपजीविका यातील फरक समजून घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले. प्राध्यापक, विद्यार्थी व मित्रपरिवार यांनी डॉ. धनंजय जाधव यांच्या कार्याबद्दल मनोगते व्यक्त करून निवृत्तीनंतरच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्यात.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने डॉ.धनंजय जाधव यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी विचार मंचावर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा.डी.टी. मुगळे, डॉ. माधव कोलपुके, उपप्राचार्य डॉ. भास्कर गायकवाड, प्रा. प्रशांत गायकवाड, स्टाफ सचिव डॉ.बालाजी गायकवाड, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. ज्ञानेश्वर चौधरी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. सुभाष बेंजलवार यांनी केले तर आभार कनिष्ठ विभागाचे स्टाफ सचिव प्रा.अभिजीत गोसावी यांनी मानले.