• Sat. Aug 30th, 2025

‘उद्या सकाळपर्यंत प्रमाणपत्र हातात द्या’; सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंसमोर गपगार!

Byjantaadmin

Aug 30, 2025

मुंबई : राजधानी मुंबईतील आझाद मैदानात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचं आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केलीय. त्यासाठी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठा बांधव मुंबईत पोहोचले असून काहीही झालं तरी आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतलीय. याचदरम्यान, राज्य सरकारचं शिष्टमंडळ आझाद मैदानात जरांगेंच्या भेटीला गेलं आहे. या शिष्टमंडळात न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचा समावेश आहे. न्या. शिंदे यांची सरकारच्यावतीने जरांगेंशी चर्चा सुरुय. त्यांनी सोबत आणलेल्या नोंदींबाबतही माहिती दिलीय. २ लाख ३९ हजार प्रमाणपत्र आम्ही मान्य केली आहेत, असंही शिंदे यांनी सांगितलं आहे. परंतु, मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. ‘आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही’ असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.

मनोज जरांगे काय म्हणाले?
ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य सरकाराच्या शिष्ट मंडळांची त्यांच्याशी चर्चा सुरुय. न्या. संदीप शिंदेंनी त्यांच्याकडून थोडा वेळ मागितलाय, पण जरांगे ऐकायला तयार नाहीत. ते म्हणाले की, ‘मराठा समाजाला कुणबी घोषित केल्याशिवाय मी हटणार नाही. आदेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी माघारी परतणार नाही. मराठवाड्यातील 1 लाख 23 हजार कुणबी गेले कुठे?’ असा सवालही जरांगेंनी केलाय. मराठवाड्यातील मराठा- कुणबी, असा अहवाल शिंदे समितीने द्यावा. ‘शिंदे समितीने 13 महिने अभ्यास केला. आता अहवाल द्यावा, आता एक मिनिटही देणार नाही, उद्या सकाळपर्यंत प्रमाणपत्र हातात द्या’, असं जरांगे यावेळी म्हणाले आहेत.मुधोजी राजे भोसले काय म्हणाले?

दरम्यान, ‘मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण हवं आहे, त्यासाठी ओबीसीतून आरक्षण देण्याची गरज नाही. मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे’, अशी भूमिका मुधोजी राजे भोसले यांनी स्पष्ट केली. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शुभेच्छा आहेत; मात्र ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही विरोध करतो’, असंही मुधोजी राजे भोसले म्हणाले. ‘देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात जे काम केलं, ते खरंच कौतुकास्पद आहे. आता, न्यायालयात टिकेल असंच आरक्षण मराठा समाजाला हवं आहे, आणि त्यावर मराठा समाज ठाम आहे’, असे नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *