• Wed. Aug 27th, 2025

बेलकुंड उपसा जलसिंचन योजनेला मुख्यमंत्र्यांकडून १९० कोटींची मंजुरी-आमदार अभिमन्यू पवार

Byjantaadmin

Aug 27, 2025

औसा : प्रतिनिधी
औसा तालुक्यातील शेतक-यांची ख-या अर्थाने हरितक्रांतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. ऐकीकडे आमदार अभिमन्यू पवार यांनी जलसमृद्ध औसा अभियान हाती घेत संपूर्ण मतदारसंघ पाणीदार करण्याचा संकल्प केला असताना दुसरीकडे त्यांच्या प्रयत्नांतून बेलकुंड उपसा जलसिंचन योजनेसाठी मोठे यश मिळाले आहे. या योजनेसाठी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९० कोटीच्या निधीला मंजुरी दिली आहे. हि योजना दहा ते पंधरा गावातील शेतक-यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडणारी असून त्यासाठी बेलकुंडसह परिसरातील तब्बल ३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

आ. अभिमन्यू पवार यांनी निम्न तेरणा प्रकल्पाच्या जलाशयातून बेलकुंड उपसा जलसिंचन याजनेच्या सर्वेक्षण व अन्वेषण कामास मंजुरी मिळवून घेऊन सर्वेक्षणाचे काम सुरु करवून घेतले होते. सर्वेक्षण व अन्वेषण काम पूर्ण झाल्यानंतर अंदाजपत्रकासह अहवाल मंजुरीसाठी सादर करण्यात आलेला होता. या १९० कोटी रुपयांच्या बेलकुंड उपसा सिंचन योजनेला (दि.२२) रोजी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे.

लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. बेलकुंड उपसा सिंचन योजनेमुळे बेलकुंड, व आजूबाजूच्या १० ते १५ गावांमधील जवळपास ३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. बेलकुंड उपसा सिंचन योजनेसाठी धरणाजवळ ५२५ एचपी क्षमतेचे ४ पंप असलेले पंपगृह उभारले जाणार आहे. पंपगृहापासून बेलकुंड वितरण कुंडापर्यंत १०५० एमएम व्यासाची व ७.१५ किमी लांबीची एमएस पाईपलाईन निर्माण केली जाणार असून सिंचन कालावधीत उर्ध्वनलिकेद्वारे पाणी उपसा केला जाणार आहे. विशेष बाब म्हणजे ‘कालवा, वितरिका वा चारी या पारंपरिक प्रणालींऐवजी बंद नलिका वितरण प्रणालीद्वारे शेतक-यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

यामुळे भूसंपादनाची आवश्यकता भासणार नाही आणि पाण्याचाही इष्टतम वापर होणार आहे. निम्न तेरणा प्रकल्पाच्या प्रवाही कालव्याद्वारे भिजणारे उमरगा, निलंगा व औसा तालुक्यातील ११६१० हे. सिंचन क्षेत्र तसेच आशिव उपसा सिंचन योजनेवरील ६८९० हे. सिंचन क्षेत्र व पाणीसाठा कायम ठेवण्यात आला असून निम्न तेरणा प्रकल्पाच्या खालील भागात तेरणा नदीवरील बांधण्यात आलेल्या नऊ बॅरेजेसच्या लाभ क्षेत्रातील पाणीवापरात होणारी बचत विचारात घेऊन बेलकुंड उपसा सिंचन योजना तयार करण्यात आली आहे.
बेलकुंड एमआयडीसी उभारण्याचे काम जलदगतीने सुरू आहे. सुमारे २४८ हेक्टरवर उभारणा-या या एमआयडीसी मुळे या भागात औद्योगिक विकास होणार आहेच तर बेलकुंड उपसा जलसिंचन योजनेमुळे या भागात हरितक्रांती घडून येणार आहे. या दोन्ही योजना तालुक्याच्या विकासासाठी मोठी उपलब्धी आहे. त्यामुळे या भागातील शेतक-यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *