• Wed. Aug 27th, 2025

लातूर जिल्हा बँकेकडून १ हजार ४ कोटी २८ लाखाचे पीक कर्ज वाटप

Byjantaadmin

Aug 27, 2025

लातूर : प्रतिनिधी राज्य व देशभरात सहकारातील यशस्वी बँक म्हणून ओळखली जात असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वर्ष २०२५-२०२६ मधील खरीप हंगामासाठी १ हजार ४ कोटी २८ लाखाचे पीक कर्ज वाटप केले आहे. शासनाकडून लातूर जिल्हा बँकेस ९३३ कोटी ९८ लाख एवढे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. इतर बँकांच्या तुलनेत लातूर जिल्हा बँक पीक कर्ज वाटपात सर्वात पुढे पहिल्या स्थानावर असून शेतक-यांच्या हक्काची बँक ही ओळख लातूर जिल्हा बँकेने कायम ठेवली आहे.

शासनाकडून लातूर जिल्ह्यातील सर्व बँकांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे ३ हजार १०० कोटी एवढे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी एकट्या लातूर जिल्हा बँकेने १३०२४४ शेतकरी सभासदांना १ हजार ४ कोटी २८ लाख एवढ्या रक्कमेचे पीक कर्ज वाटप केलेले आहे. पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट एप्रिल २०२५ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीसाठी असून लातूर जिल्हा बँकेने १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत १०८ टक्के एवढे उद्दिष्ट गाठले आहे. सप्टेंबर २०२५ अखेर जवळपास १३५ टक्के पीक कर्ज उद्दिष्ट पुर्तता होईल, असे बँकेच्या वतीने कळवण्यात आले आहे.

एकट्या लातूर जिल्हा बँकेने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक १०८ टक्के एवढे पीक कर्जवाटप करून शेतक-यांप्रती बांधिलकी जोपासली आहे. प्राप्त आकडेवारीचा तुलनात्मक विचार केल्यास इतर बँकांच्या तुलनेत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १०८ टक्के केलेले कर्जवाटप हे उल्लेखनीय आहे. लातूर जिल्हा बँकेच्या या उद्दिष्ट पूर्तिमूळे शासनाने दिलेल्या उद्दिष्टात लातूर जिल्हा बँकेने मोलाचा वाटा उचलला आहे. लातूर जिल्हा बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख, सर्व संचालक मंडळाने सातत्याने लातूर जिल्ह्यातील शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे यावरून दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *