• Wed. Aug 27th, 2025

संग्राम थोपटेंच्या मदतीवरून महायुतीत ठिणगी

Byjantaadmin

Aug 27, 2025

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. यामध्ये पुणे जिल्ह्यातील राजगड सहकारी साखर कारखाना लि. अनंतनगर निगडे, (ता. भोर) या साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून खेळत्या भांडवलासाठी घेण्यात येणा-या मार्जिन मनी कर्जास मंजुरी देण्यात आली. या साखर कारखान्याला ४६७ कोटी रुपयांच्या कर्जाला हमी राज्य सरकारने दिली आहे. संग्राम थोपटे यांच्या साखर कारखान्याला मदत करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोध केल्याची माहिती आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी अशा प्रकारची हमी इतर कारखान्यांना दिल्याची भूमिका मांडली.

संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याच्या कर्जाला शासनाच्या हमीचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर बंद पडलेल्या कारखान्याला कर्जाची हमी का द्यायची असा प्रश्न अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित केला. तर अशा अनेक कारखान्यांना आपण हमी दिलेली आहे, राजगडला का नको अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. त्यानंतर संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याच्या कर्जाला राज्य सरकारने हमी दिली आहे.

भाजपात प्रवेश केलेले संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याच्या कर्जाला हमी देण्यासाठी आज मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. मात्र, हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत येताच अजित पवारांनी कडाडून विरोध केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: मध्यस्थी केल्यामुळे या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. पवार कुटुंबीय आणि थोपटे कुटुंबीयांचा वाद हा नेहमीच पाहायला मिळाला तोच वाद आज मंत्रिमंडळाच्या बैठकीतही समोर आला. या साखर कारखान्याला ४६७ कोटी रुपयांच्या कर्जाला हमी राज्य सरकारने दिली आहे.

संग्राम थोपटे भाजपमध्ये, कारखान्याला दिलासा
संग्राम थोपटे यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस मध्ये असताना महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे काम केले होते. तर, त्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भोरमधून शंकर मांडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आणि संग्राम थोपटे यांचा पराभव करण्यात अजित पवार यांना यश आले. दरम्यानच्या काळात राजगड सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती आणि राज्य सरकारकडून मदत मिळवण्यासाठी संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आज संग्राम थोपटे यांच्या कारखान्याच्या कर्जाला हमी देण्याचा निर्णय शासनाने घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *