नैसर्गिक आपत्तीच्या काळात कृषी विभागाचा कारभार ‘रामभरोसे’
कृषी विभागाचे अधिकारी अन् कर्मचारी ‘मुख्यालयी’ नाहीच
निलंग्याचा कृषी विभाग असून अडचण नसून खोळंबा
………
निलंगा, : गेल्या कांही दिवसापासून तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे खरिप हंगामातील उडीद, मूग, तूर यासह सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या क्षेत्राची माहिती देण्यासाठी शेतकरी कृषी कार्यालयाला खेटे घालत आहेत मात्र नैसर्गिक आपत्तीच्या काळात अधिकारी व कर्मचारी ‘मुख्यालयी’ राहत नसल्याने तालुका कृषी विभागाचा कारभार ‘रामभरोसे’ झाला आहे. कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर शेतकऱ्यांकडून मिश्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

……
तालुक्याचे कार्यक्षेत्र मोठे असून १६२ महसुली गावाचा समावेश आहे. यंदा मृग नक्षत्रात पेरणी झाल्यामुळे सोयाबीनसह खरिप हंगामातील पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यातील विविध भागात चांगला पाऊस झाला आहे तर काही महसुली मंडळात अतिवृष्टी झाली आहे. निटूर महसूल मंडळात तर १२० मिलिमीटर पाऊस झाला आहे. तालुक्यातील मांजरा व तेरणा या दोन्ही नद्या भरून वाहत आहेत. अतिवृष्टीच्या काळात सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिले असतानाही कृषी विभागाचा कारभार मात्र रामभरोसे झाला आहे. या कार्यालया अंतर्गत तीन मंडळ कृषी कार्यालय असून प्रत्येक मंडळाला दोन सुपर वायझर व प्रत्येक सपर वायझरच्या अधिकाराखाली सहा असिस्टंट (कृषी सहायक) आहेत मात्र कोणतेही अधिकारी अथवा कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. कृषी विभागाच्या कार्यालयीन कामकाजाच्या रचनेत क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी व कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी असे दोन विभाग असले तरी क्षेत्रिय कर्मचारी बहूतांश वेळा ना क्षेत्रावर ना..शेतावरती दिसत नाहीत.. ना.. कधी तालुका कृषी कार्यालयात दिसत नाहीत अशी स्थिती सध्या तालुक्यात निर्माण झाली असून तालुका कृषी अधिकारीच मुख्यालयी राहत नसल्यामुळे व त्यांचा कर्मचाऱ्यांवर कोणताही धाक नसल्याने शेतकऱ्यांची मात्र हेळसांड होतांना दिसत आहे.
……
तालुका कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी प्रभावी काम करत नसल्याच्या तक्रारी असून शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न वाढवणे, कृषी योजना राबवणे, माहिती देणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसान झालेल्या पिकाची माहिती कळवणे असे असतानाही पदभार असलेल्या एखाद्या गावात जावून भेट घेणे, त्यानंतर गायब होणे असे प्रकार दिसत आहे. तीन-चार गावचा पदभार असल्याने अधिकारी, कर्मचारी कोणत्या गावात आहेत हे निश्चितपणे दिसून येत नाही. केवळ कागदोपत्री दौरै दाखवून वरिष्ठांची फसवणूक केली जात असल्याचे दिसत आहे.
….
कोण विचारणार?
…….
तालुका कृषी अधिकारी हेच मुख्यालयी राहत नाहीत तर त्यांच्या अधिन काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काम विचारण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही सध्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक विमा अथवा नुकसानी बाबत शेतकरी कार्यालयात खेटे घालत आहेत मात्र तेथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही भेटत नसल्यामुळे नाईलाजाने त्यांना परतावे लागत आहे
…..
छावा स्टाईलने पंचनामा करू :
…..
सध्या शेती पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून अधिकारी अन् कर्मचारी त्यांचे कागदोपत्री दौरै दाखवून खासगी कामात व्यस्त दिसतात थोडावेळ थांबायचे हजेरी लावायची मिटींग आहे म्हणून गायब व्हायचे असा प्रकार सर्रास सुरू आहे त्याचबरोबर कार्यालय कुठे आहे याचा पत्ताही शेतकऱ्यांना लागत नाही त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांच्या कामात हलगर्जीपणा केला तर छावा स्टाईलने पंचनामा करू असा इशारा तालुकाध्यक्ष तुळशीदास साळूंके यांनी दिला आहे.
…….
नाथराव शिंदे : तालुका कृषी अधिकारी
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिका संदर्भात तहसीलदार यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत लवकरच तलाठी व कृषी सहायक पंचनामे करतील जे कृषी सहायक कुचराई केल्या नंतर तक्रार प्राप्त होताच त्यांच्यावर कारवाई करू