विविध प्रश्नांची तत्काळ सोडवणूक करा- कास्ट्राईब महासंघाची गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी..
निलंगा, विविध विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची बैठक संपन्न झाली. पंचायत समिती निलंगा येथील सभागृहात गटविकास अधिकारी सोपान अकेले यांनी त्यांच्या सर्व खाते प्रमुख व कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष नागसेन कांबळे व इतर पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न झाली.
यात जिल्हाध्यक्ष नागसेन कांबळे यांनी अनेक प्रलंबित प्रश्नासंदर्भात गट विकास अधिकाऱ्यांचे खालील प्रश्नांसंदर्भात लक्ष वेधले त्यात प्रामुख्याने शिक्षण विभागातून निवड श्रेणी प्रस्ताव गहाळ होणे, मेडिकल बिलअदा करण्यासाठी अर्थपूर्ण व्यवहार करणे, गोपनीय अहवालाची प्रत देणे, दुय्यम सेवा पुस्तिका अद्ययावात करणे, आय.सी.डीएस. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत काढणे, सातव्या वेतन आयोगाच्या वेतननिश्चितीची पडताळणी करणे, शिक्षक पुरस्कार निवड व वितरण करणे, अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस यांचे कपात केलेली वेतन अदा करणे, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल तीन वर्षापासून प्रलंबित आहेत ते तात्काळ देणे. शासनाच्या विविध योजनांचे ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करणे, इत्यादी अनेक प्रश्नाची सोडवणूक करण्याची मागणी करण्यात आली.
या मागण्यांना गटविकास अधिकारी सोपान अकेले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. चर्चेअंती अर्ध्या प्रश्नांची बैठकीतच सोडवणूक केली.उर्वरित सर्वच प्रश्न येत्या आठ दिवसांमध्ये मार्गी लावले जातील असे गटविकास अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.
या बैठकीस गटविकास अधिकारी सोपान अकेले, पशुसंवर्धन विकास तालुका आरोग्य अधिकारी,यांच्यासह अनेक विभागप्रमुख व महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष नागसेन कांबळे,उपाध्यक्ष डि के सूर्यवंशी, निलंगा तालुका अध्यक्ष दीपक कांबळे,सचिव भिवाजी लखनगावे ,सहसचिव आनंद सूर्यवंशी,पत्रकार किशोर सोनकांबळे, प्रशासन अधिकारी बालाजी मोहोळकर, यमलवाड, मलशेट्टे यांच्यासह विविध खात्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी निलंगा तालुक्यामध्ये विक्रमी वृक्ष लागवड केल्यामुळे कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे गट विकास अधिकाऱ्यांचा ” वृक्षमित्र” म्हणून सत्कार करण्यात आला.
