• Thu. Feb 5th, 2026

आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचार्यांच्या न्याय हक्कसाठी कॉंग्रेस शासनाशी भिडणार-लातूर जिल्हा कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांचे प्रतिपादन

Byjantaadmin

Aug 22, 2025

लातूर;- जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागात कंत्राटी तत्वावर काम करणारे सुमारे ९५० अधिकारी व कर्मचारी यांनी दि. १९ ऑगस्ट २०२५ पासून आपल्या विविध मागण्यांकरिता संविधानिक मार्गाने बेमुदत आंदोलन पुकारलेले आहे. या आंदोलानाचा आज चौथा दिवस असून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. अभय साळुंके यांनी जिल्हा परिषदेच्या आवारातील आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या पक्षाचा सदर आंदोलनास जाहीर पाठींबा असल्याचे नमूद केले.

यावेळी, कर्मचार्यांच्या मागण्या जाणून घेऊन त्या अनुषंगाने जिल्हा कॉंग्रेस पक्ष न्याय व हक्कासाठी आपल्या सोबत असून, राज्य पातळीवर देखील पक्षाचा या आंदोलनास पाठींब्यासाठी पुढाकार घेऊन राज्य शासनास या आंदोलनाची दखल घेण्यास भाग पाडू तसेच जर या आंदोलकांच्या रास्त मागण्याची दखल शासनाने त्वरित न घेतल्यास, प्रसंगी कॉंग्रेस पक्ष शासनास संविधानीक मार्गाने भिडण्याची भूमिका घेईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, एकत्रीकरण समिती मार्फत त्यांना आंदोलकांच्या मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हास्तरीय एकत्रीकरण समितीचे हेमंत सोळुंखे, अबरार मोहसीन, गिरीश कुलकर्णी, डॉ. अशुकेत वैरागे, डवरी संगीता, आनंद दिवे, संदिप त्रिकोळीकर, ओमप्रकाश सोनवणे, पांडुरंग मुळे, पूजा पाटील, बालिका बिराजदार व जिल्ह्यातील इतर सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दि.१४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करणे, वेतन वाढ, बोनस, विमा धोरण, बदली धोरण, PMMVY कर्मचार्यांचे NHM मध्ये समायोजन आणि प्रलंबित मानधन इत्यादी मागण्यांसाठी राज्यभरात बेमुदत कामबंद आंदोलन सुरु असून त्याचाच भाग म्हणून लातूर जिल्हा परिषदेच्या आवारात दि. १९ ऑगस्ट २०२५ पासून आरोग्य विभागातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आंदोलनाचा आज चौथा दिवस असून जिल्ह्यातील आरोग्य सेवा विस्कळीत होत असल्याने शासनाने तात्काळ या आंदोलनाची दखल घेण्याची आंदोलकांनी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *