• Fri. Aug 22nd, 2025

मुंबई – लातूर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार? लातूरकरांना मुंबई गाठणे होणार सोयीचे

Byjantaadmin

Aug 22, 2025

मुंबई – लातूर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार? लातूरकरांना मुंबई गाठणे होणार सोयीचे

मुंबई : राज्यासह देशभरात वंदे भारत एक्स्प्रेसचे जाळे विणले जात आहे. नुकताच नागपूर – पुणेदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. आता मुंबई – लातूर ही दोन शहरे वंदे भारत एक्स्प्रेसने जोडली जाणार आहेत. त्यामुळे लातूरकरांना मुंबई गाठणे अधिक सोयीचे होईल.

लातूर हे इतिहास, संस्कृती, आणि निसर्गाचा त्रिवेणी संगम असलेले ठिकाण आहे. लातूर येथे सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर, अष्टविनायक मंदिर, विराट हनुमान मंदिर, सूरत शहवली दर्गा अशी धार्मिकस्थळे आहेत. यासह उदगीर किल्ला, औसा किल्ला, खरोजा लेण्या आणि गंज गोलाई बाजारपेठ आहे. तसेच देशातील सोयाबीनचे सर्वात मोठे व्यापारी केंद्र लातूर येथे आहे. त्यामुळे धार्मिक, ऐतिहासिक आणि व्यापारी केंद्र म्हणून लातूर प्रसिद्ध आहे. मुंबई आणि लातूर ही दोन शहरे एकमेकांना जोडण्यासाठी लातूरमधील लोकप्रतिनिधी आणि प्रवाशांकडून मागणी केली जात होती. प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई – लातूर वंदे भारत एक्स्प्रेसने जोडण्यास मंजुरी मिळाली आहे. मुंबई – लातूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यास प्रवाशांना या सेवेचा लाभ होईल.

मुंबईत ये-जा करण्याचा प्रवास कालावधी कमी करण्यासाठी, प्रवाशांना आरामदायी सेवा पुरविण्यासाठी, राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणांना वंदे भारत मुंबईशी जोडली जात आहे. गांधीनगर, शिर्डी, सोलापूर, मडगाव, जालना, नांदेड या धार्मिक, व्यावसायिक, शैक्षणिकस्थळांना वंदे भारत जोडली आहे. आता लातूरसाठी वंदे भारत सुरू होणार असल्याने मुंबई आणि मराठवाडा जोडला जाईल.

थांबे कुठे असणार

सीएसएमटी – लातूर वंदे भारत एक्स्प्रेसला सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण, पुणे, कुर्डुवाडी, धाराशिव आणि लातूर असे थांबे देण्याचे नियोजन आहे. तसेच सीएसएमटीवरून सकाळी ६ वाजता वंदे भारत लातूरच्या दिशेने निघेल. तर, लातूर येथे दुपारी १ ते १.३० पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. मात्र, यात बदल होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेवरील अजनी (नागपूर) – पुणेदरम्यान नुकतीच वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली. राज्यातील ही १२ वी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. तसेच मुंबई – जालना वंदे भारत एक्स्प्रेसचे विस्तारीकरण हुजूर साहिब नांदेड या रेल्वे स्थानकापर्यंत करण्यात आले असून पुढील आठवड्यात या सेवेला सुरुवात होईल. या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांना जोडली होती. आता या वंदे भारत एक्स्प्रेसचे विस्तारीकरण झाल्याने परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांतील प्रवाशांना मुंबईत येण्यासाठी पर्यायी सोय उपलब्ध झाली आहे. या सेवेचे तिकीट आरक्षण सुरू झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *