• Fri. Aug 22nd, 2025

लातूरकरांचे विमान प्रवासाचे स्वप्न लवकरच  वास्तवात उतरणार : खा. डॉ. शिवाजी काळगे

Byjantaadmin

Aug 22, 2025

लातूरकरांचे विमान प्रवासाचे स्वप्न लवकरच  वास्तवात उतरणार : खा. डॉ. शिवाजी काळगे 

लातूर : लातूरकरांचे विमान प्रवासाचे स्वप्न लवकरच वास्तवात उतरणार असल्याची ग्वाही लातूर लोकसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष खा. डॉ. शिवाजी काळगे यांनी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी प्रत्यक्ष झालेल्या बैठकीनंतर दिली. 

लातूरला नियमितपणे विमान सेवा सुरु करण्यात यावी, अशी मागणी मागच्या अनेक वर्षांपासून सातत्याने लावून धरली जात आहे. लातूर हे शैक्षणिक, आद्योगिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या एक विकसनशील शहर आहे. लातूरला हवाई वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात आणि या ठिकाणाहून लवकरात लवकर विमान सेवा सुरु करावी, या मागणीसाठी खा. डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे  यांनी गुरुवारी, दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी नवी दिल्लीत मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन  याबाबतीत विस्तृत अशी चर्चा केली. लातूरला विमान सेवा सुरु करणे किती आवश्यक आहे, ही बाबही त्यांनी मोहोळ यांच्या निदर्शनास आणून दिली. खा. काळगे  यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लातूरहुन लवकरात लवकर विमान सेवा सुरु करण्यास संमती दर्शवली. केवळ संमतीच दर्शवली नाही तर मागच्या अनेक वर्षांपासून एमआयडीसीकडे असलेला लातूर विमानतळाचा ताबा  गुरुवार पासूनच एमएडीसी अर्थात महाराष्ट्र एव्हिएशन डेव्हलपमेंट कंपनीकडे ( महाराष्ट्र विमान वाहतूक विकास कंपनी ) हस्तांतरित करण्यात आला आहे. आता या विमानतळाचे सर्वस्वी अधिकार एमएडीसी आल्याने या संदर्भांत लवकरच बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती खा. डॉ. शिवाजी काळगे यांनी दिली. 

लातूरला विमानसेवा सुरु झाल्यासत्याचा लातूरसह मराठवाडा आणि परिसरातील व्यावसायिक, उद्योजक आणि सामान्य नागरिकांची चांगली सोय  होणार आहे. खा. डॉ. काळगे  यांच्या या यशस्वी प्रयत्नाबद्दल लातूर लोकसभा मतदार संघातील मतदारांतून समाधान व्यक्त केले जात आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *