गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद शांततेत साजरे करून सामाजिक एकोपा जपूया – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
· शांतता समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
लातूर, : आपल्या जिल्ह्याची शांतताप्रिय जिल्हा अशी ओळख आहे. सर्वधर्मीय सण, उत्सव आतापर्यंत उत्साहाने आणि सामाजिक सलोखा जपत साजरे झाले आहेत. हीच वैभवशाली परंपरा कायम ठेवत यंदाचा पोळा, गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद शांततामय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. दयानंद सभागृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस प्रशासनातर्फे ‘माझं लातूर, सुरक्षित लातूर’ हा अभिनव उपक्रम राबवला जाणार असून, यात जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर महानगरपालिका आयुक्त मानसी, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि मुस्लिम बांधव उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या, गणेशोत्सवात ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी आदी विषयांवर देखावे सादर करावेत. नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश द्यावा. सर्वधर्मीयांनी एकत्र येऊन सामाजिक विश्वास दृढ करावा. गतवर्षी लातूरच्या गणेशोत्सव मंडळाला राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. यंदा प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी सामाजिक संदेश देणारे उत्कृष्ट देखावे सादर करावेत. डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी सहकार्य करण्याचे आणि पारंपारिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद साजरे करताना सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करावे आणि पर्यावरणपूरक उत्सव साजरे करावेत, असेही त्या म्हणाल्या. जिल्हा प्रशासन उत्सवकाळात आवश्यक सुविधा उपलब्ध करेल, असे त्यांनी आश्वासित केले.
पोलीस प्रशासन राबविणार ‘माझं लातूर, सुरक्षित लातूर’ उपक्रम
जिल्ह्यातील वृक्ष लागवड चळवळीला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सुरु केलेल्या ‘माझं लातूर, हरित लातूर’ उपक्रमाच्या धर्तीवर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी ‘माझं लातूर, सुरक्षित लातूर’ हा उपक्रम जाहीर केला. प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने आपल्या मंडपात किमान चार सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, असे आवाहन त्यांनी केले. उत्सव संपल्यानंतर हे कॅमेरे परिसरातील चौकात लावावेत आणि पुढील उत्सवात पुन्हा मंडपात वापरावेत. यामुळे लातूर शहरात ५ हजारपेक्षा जास्त कॅमेरे लागतील, ज्यामुळे सुरक्षेला बळ मिळेल. डॉल्बीवरील खर्च टाळून मंडळांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. तांबे म्हणाले. जास्त कॅमेरे लावणाऱ्या मंडळांचा तालुका, उपविभाग आणि जिल्हास्तरावर सन्मान केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आवाजाच्या मर्यादेचे पालन करावे. डॉल्बी लावण्यास परवानगी नसून, मर्यादा ओलांडल्यास कठोर कारवाई होईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. तांबे यांनी स्पष्ट केले. मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादची मिरवणूक गणेशोत्सवानंतर काढण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, सर्वधर्मीयांनी सण-उत्सव शांततेत आणि नियम पाळून साजरे करावेत, असे आवाहन केले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एक मंडळ, एक अंमलदार संकल्पनेतून प्रत्येक मंडळासाठी समन्वयक अंमलदार नेमला जाईल, असे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात ‘एक गाव-एक गणपती’ संकल्पना
ग्रामीण भागात ‘एक गाव-एक गणपती’ संकल्पना राबवली जाईल. ग्रामपंचायतीमार्फत मंडळांना आवश्यक सुविधा पुरवल्या जातील. कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायतींमध्ये समन्वय राहील, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी सांगितले.
गणेशोत्सव मंडळांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील
लातूर शहरातील गणेशोत्सव मंडळांनी मांडलेल्या अडचणींची नोंद घेण्यात आली आहे. याबाबत गुरुवारी बैठक घेऊन तातडीने कार्यवाही केली जाईल. मंडळांना जास्तीत जास्त सुविधा देऊन उत्सव उत्साहात साजरा होईल, यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे, असे आयुक्त श्रीमती मानसी यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाच्या २०१० च्या मंडप उभारणीविषयक आदेशांचे पालन करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी केले. अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनीही आपले विचार मांडले. बैठकीत गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि मुस्लिम बांधवांनी सूचना मांडल्या. उदगीरचे उपविभागीय अधिकारी गजानन भातलवंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
