• Wed. Aug 20th, 2025

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये तातडीची मदत द्या, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची मागणी

Byjantaadmin

Aug 20, 2025

मुंबई : गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पश्चिम महाराष्ट्र या अनेक भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अशातच आता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत तातडीने द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राज्यात मागील तीन चार दिवसात मुसळधार पावसाने अनेक भागात पुरस्थिती उद्भवली आहे. या पावसाचे पाणी शेतात शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, उभी पिके वाहून गेली आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास 15 लाख एकर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतपिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे समजते. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करा व शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीने मदत द्या, असे सपकाळ यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लिहिले आहे की, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास 17 जिल्ह्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. उत्तर महाराष्ट्र व कोकणातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्वारी, बाजरी, उडीद, मका, सोयाबिन, मूग, कापूस, तूर, फळे व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टरवरील ऊसालाही मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्याचे पशूधन वाहून गेले आहे, तर नांदेड जिल्ह्यात जीवितहानीही झाली आहे. आधीच संकटाचा सामना करत असलेल्या बळीराजाला निसर्गाने आणखी संकटात टाकले आहे, असे सपकाळांनी आपल्या पत्रातून म्हटले आहे.

तर, राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी सरकारने या कठीण प्रसंगी सर्व नियम, अटी व शर्थी बाजूला ठेवून शेतकऱ्यांची मदत केली पाहिजे. जेथे जीवितहानी झाली आहे, त्यांच्या कुटुंबीयांचा सहानुभूतीपूर्ण विचार करून मदत करावी, असे सपकाळ यांनी आपल्या पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्या या पत्राला मुख्यमंत्री फडणवीस काय उत्तर देतात किंवा खरंच शेतकऱ्यांना तत्काळ मदत करतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *