महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळानं 12 ऑगस्टच्या बैठकीत 15631 पदांची पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार गृह विभागानं 15631 जागांवर पोलीस शिपाई भरती करण्याचा निर्णय घेतण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणा-या भरती प्रक्रियेस मान्यता देणारा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
शासन निर्णयात काय म्हटलंय?
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दि.1 जानेवारी 2024 ते दि 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त झालेली आणि शासन निर्णय क्रमांकः पोलीस-1125/प्र.क.173/पोल-5अ, दिनांक 20 ऑगस्ट, 2025 दि.01 जानेवारी 2025 ते दि 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त होणारी 15631 पदे भरतीकरीता उपलब्ध होणार आहेत.
पदनाम : रिक्त पदांची संख्या
1. पोलीस शिपाई : 12399
2.पोलीस शिपाई चालक : 234
3. बॅण्डस्मन : 25
4 सशस्त्र पोलीस शिपाई : 2393
5 कारागृह शिपाई : 580
एकूण 15631
शासन निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 4 मे 2022 आणि 21 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयातील तरतूदींमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन 2024-25 ची भरती प्रक्रिया घटकस्तरावरुन राबविण्यास तसेच OMR आधारीत लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. सन 2022 व सन 2023मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात आलं आहे.या भरती प्रकियेसाठीही या पूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.450/- व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.350/- इतके परीक्षा शुल्क आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरुपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरीता खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज
महाराष्ट्रात लाखो तरुण आणि तरुणी पोलीस भरतीची तयारी करत असतात. राज्य सरकारनं 2024 आणि 2025 मधील रिक्त जागा मिळून 15631 जागांवर पोलीस शिपाई भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णय जारी झाल्यानं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारनं आज जीआर प्रसिद्ध केला असून या मध्ये भरतीची प्रक्रिया, राबवण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस भरती संदर्भातील गृह विभागाचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानं आता पोलीस शिपाई भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भातील प्रक्रिया सुरु होईल.
