• Wed. Aug 20th, 2025

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची पूरग्रस्त गावांना भेट; नुकसानीचे पंचनामे, उपाययोजनांचा घेतला आढावा

Byjantaadmin

Aug 20, 2025

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची पूरग्रस्त गावांना भेट; नुकसानीचे पंचनामे, उपाययोजनांचा घेतला आढावा

लातूर,: जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज उदगीर तालुक्यातील पूरग्रस्त मौजे बोरगाव बुद्रुक, धडकनाळ आणि टाकळी या गावांना भेट देऊन पूरग्रस्त भागातील शेती, घरांचे नुकसान आणि इतर बाधित क्षेत्रांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाची बैठक घेऊन पंचनामे, उपाययोजना आणि नागरिकांच्या आरोग्य सुविधांबाबत आढावा घेतला.

जिल्हाधिकाऱ्यांनी बोरगाव येथील तानाजी धोंडीबा सुभाने, हनुमंत अर्जुन सुभाने आणि रमेश अर्जुन सुभाने यांच्या घरांना भेट देऊन पाहणी केली, जिथे तीन ते चार फूट पाणी साचले होते. त्यांनी गावकऱ्यांना प्रशासनाच्या सर्व उपाययोजनांची माहिती देऊन आश्वस्त केले. पीक नुकसानी, मृत जनावरे, पडझड झालेली घरे आणि इतर नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान त्वरित वितरित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बोरगाव आणि धडकनाळ गावातील विद्युत पुरवठा आजच सुरळीत करण्याच्या सूचना देतानाच, गावात अस्वच्छतेमुळे रोगराई पसरणार नाही यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या. विविध सेवाभावी संस्था आणि व्यक्तींनी पूरग्रस्तांना केलेल्या मदतीचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, महावितरणचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. यादव, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *