लातूर जिल्ह्यात पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आढावा
• बॅरेजस दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा
लातूर, दि. १९ (जिमाका): जिल्ह्यात सततच्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आणि उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्याकडून आज सकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पालकमंत्र्यांनी प्रशासनाला पूरपरिस्थिती, रस्ते वाहतूक, आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील नद्या, नाले आणि धरणांच्या पाणीपातळीवर लक्ष ठेवण्यासह, आवश्यक त्या ठिकाणी मदतकार्य वेगाने राबवण्याचे, नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी, नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष फिल्डवर राहून नागरिकांना आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन करावे, असे पालकमंत्री म्हणाले.
येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. विशेषत: नदीकाठावरील गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. पुराच्या पाण्यातून प्रवास करणे टाळण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली असून, नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत पुरवण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जात असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची, तसेच त्या अनुषंगाने प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या मदतकार्य, नुकसानीचे पंचनामे आदी बाबींची माहिती दिली.
बॅरेजस देखभाल, दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरवा
लातूर जिल्ह्यातील काही बॅरेजसची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याची बाब जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. या कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याबाबत पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
