छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या पाच दिवसापासून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, बीड या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. काल पर्यंत मराठवाड्यात मृतांची संख्या ही सहा होती. मात्र ही आता वाढून 11 झाली आहे. प्रशासनाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भिती ही व्यक्त केली जात आहे. पावसाने सध्या उसंत घेतली असली तरी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समोर आलं आहे.

गेल्या पाच दिवसांत 11 जणांचा बळी पावसामुळे मराठवाड्यात गेला आहे. तर जवळपास 498 जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.. त्याच बरोबर तब्बल 601 घरांची-गोठयांची पडझड झाली आहे. मराठवाड्यातील 4 लाख 38 हजार 351 शेतकऱ्यांना या पावसाचा जबर फटका बसला आहे. यातून 3 लाख 58 हजार 370 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हा आकडा प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर आणखी वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचं थैमान पाहायला मिळत होतं. जिल्ह्यातील नारेगाव पिसादेवी परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. पुराचे पाणी ओसरत असलं तरीही नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झालं आहे. जिल्ह्यातील नऊ मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. तर सोयगाव तालुक्यातील सोना नदीला पूर आलं आहे. तर जायकवाडी क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे.
नांदेड जिल्ह्यात मुखेडमध्ये ढगफूटी झाली होती. इथलं नुकसान हे मोठं आहे. सध्या इथं अजूनही बचाव कार्य सुरू आहे. लष्करालाही या भागात पाचारण करण्यात आलं आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. लोकांना तातडीने मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाच दिवसानंतर या भागात पावसाने उसंत घेतली आहे. पण पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पावसामुळे या भागात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आता समोर येत आहे. तातडीने पंचनामे करा आणि मदत करा अशी मागणी आता होत आहे.