• Mon. Aug 18th, 2025

राज्यात 5 दिवस पावसाचा मुक्काम! 21 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, हेल्पलाईन क्रमांक जाहीर

Byjantaadmin

Aug 18, 2025
Transparent umbrella under heavy rain against water drops splash background. Rainy weather concept.

राज्यात दोन दिवसांपूर्वी पावसानं पुनरागमन केलं आहे. सुरुवातीला विदर्भात पावसानं हजेरी लावली. तर दोन दिवसांपासून मुंबईसह अनेक भागात दमदार पाऊस होत आहे. या पावसामुळे स्वातंत्र्यदिन आणि शनिवार-रविवार असा लाँग विकेंड साजरा करण्यासाठी बाहेर जाणाऱ्यांच्या इच्छेचा हिरमोड झाला आहे. आता तुम्ही रविवारी किंवा पुढील काही दिवस बाहेर जाण्याचे प्लॅन आखत असाल तर घरीच बसा. कारण जोरदार पावसामुळे तुमच्या सर्व स्वप्नांवर पाणी पडू शकतं.

21 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा 

भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस म्हणजेच 21 ऑगस्ट 2025 पर्यंत अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून ही माहिती देण्यात आलीय. 

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीसह अत्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मराठवड्यात  काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. या भागात  वीज चमकणे, गडगडाट, वादळी वारे (40) 50 किमी/ताशी) यांची शक्यता हवामान खात्यानं दिली आहे.

मासेमारांसाठी इशारा 

कोकण किनारपट्टीवर 20 ऑगस्टपर्यंत 50-60 किमी/ताशी वारे वाहण्याचा अंदाज आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे मासेमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.   रायगड जिल्ह्यातील अंबा नदीने धोका पातळी तसेच कुंडलीका नदी,  रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली असून याबाबत नागरिकांना सूचित करण्यात आले आहे. नागरिकांनी पूरस्थिती पासून सुरक्षित राहण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सूचना देण्यात आल्या असून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

हेल्पलाईन क्रमांक जाहीर 

अतिवृष्टीची शक्यता असल्यानं नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.  सचेत ॲपमार्फत नागरिकांना सूचना आपत्तीपासून सतर्क राहण्यासाठी सद्यस्थितीमध्ये नागरीकांना सचेत ॲपमार्फत अलर्ट संदेश  पाठविले जात आहेत. आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल  यांना आपत्कालीन परिस्थिती करिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

मंत्रालयीन स्तरावरील राज्यस्तरीय आपत्कालीन कार्यकेंद्र २४x७ सुरू आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षासाठी फोन नं. ०२२-२२०२७९९० किंवा ०२२-२२७९४२२९ किंवा ०२२-२२०२३०३९ तसेच मोबाईल – ९३२१५८७१४३ उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *