माहेश्वरी परिवाराच्या वतीने आयोजित जन्माष्टमी झुला सजावट स्पर्धेचे विजेतेपद ‘ द्वारकानगरी ‘ गुपने पटकावले
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या औचित्य साधून आयोजिण्यात आलेल्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर : लातूर जिल्हा माहेश्वरी सभा, लातूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटन, युवा माहेश्वरी व किशोरी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लातूरच्या बालाजी मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या जन्माष्टमी झुला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक द्वारकानगरी की बहुरानियाँ ग्रुप ने पटकावले. या स्पर्धेत एकूण आठ ग्रुप्सने आपला सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत हरीप्रिया ग्रुप, सोनी ग्रुप, लाहोटीज एम्पायर ग्रुप, द्वारकानगरी की बहुरानिया ग्रुप,गोपिया ग्रुप, कान्हा की प्यारी गोपिया ग्रुप, मुरली ग्रुप, धर्मरक्षक ग्रुप अशा एकूण आठ ग्रुपने सक्रिय सहभाग घेतला. या आठ ग्रुपमधून ७० हुन अधिक सदस्या सहभागी झाल्या होत्या. सहभागी सदस्यांनी आपल्या कलाकृतींमधून श्रीकृष्णभक्तीचे अप्रतिम दर्शन घडवले. प्रत्येक गटाने झुला सजावटीत सुंदर कल्पकता व मनापासून मेहनत घेतली. सर्व गटांचा उत्साह, श्रम आणि भक्तिभाव खरोखरच अनुकरणीय ठरला. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक प्रथम – द्वारकानगरी की बहुरानिया ग्रुपने पटकावले. द्वितीय पारितोषिक कान्हा की प्यारी गोपिया ग्रुपने तर तृतीय पारितोषिक गोपिया ग्रुपने पटकावले.
पारितोषिक वितरण सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अनिल राठी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी सीए प्रकाश कासट, फुलचंद काबरा, जगदीश भूतडा, राम भूतडा, अभिषेक मुंदडा, गिरीश सोनी, आलोक बाहेती, निकुंज भूतडा, योगेश मालपाणी, प्रांजल डागा, संस्कृती लोया,आनंद राठी (चैतन्य मंगल कार्यालय), तसेच प्रोजेक्ट चेअरमन सच्चय राठी, साईराज रांदड व सेजल सोनी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या झुला सजावट सोहळ्यात सहभागी झालेल्या गटांनी एकापेक्षा एक सरस देखावे प्रस्तुत करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमास समाजातील नागरिकांनीही भरपूर प्रतिसाद दिला. या सोहळ्यास मिळालेला प्रतिसाद पाहून संयोजनाचाही उत्साह दुणावला असून त्यांनी पुढील काळातही अशाच प्रकारचे कार्यक्रम समाजात घेण्यात येतील, असा विश्वास व्यक्त केला.
स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्या सर्व गटांच्या अथक प्रयत्नांमुळे, मान्यवरांच्या सहकार्यामुळे आणि सहभागींच्या उत्साही प्रतिसादामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. माहेश्वरी समाजाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र हा सोहळा समाजातील ऐक्य, सर्जनशीलता व उत्सवप्रियतेचे हे सुंदर उदाहरण ठरले
