लातूर जिल्ह्यात 17 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी; जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा घेतला आढावा

सिंचन प्रकल्पांची पाहणी करण्यासह संभाव्य पूरपरिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना
लातूर, दि. 18 : आज, 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांमध्ये लातूर जिल्ह्यातील 17 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यापैकी काही मंडळांमध्ये 100 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. तसेच, जिल्ह्यातील 13 लघु सिंचन प्रकल्प आणि साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून, त्यांच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सर्व शासकीय यंत्रणांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी त्यांनी पुढील काही दिवसांत पूरपरिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या प्रशासक तथा अधीक्षक अभियंता रुपाली ठोंबरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांच्यासह महसूल, पाटबंधारे, महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश दिले. पूरपरिस्थितीमुळे कोणत्याही गावात जीवितहानी होऊ नये, यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. पूरामुळे पिण्याच्या पाण्याचे जलस्त्रोत दूषित होण्याची किंवा अस्वच्छतेमुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेने त्वरित कार्यवाही करावी. सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध असल्याची खातरजमा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. सध्याच्या पावसाची स्थिती आणि पुढील काही दिवसांत अशाच स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व सिंचन प्रकल्प आणि साठवण तलावांची पुन्हा पाहणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रकल्पांचे दरवाजे, भिंती आणि सांडव्यांची सद्यस्थिती तपासावी, असेही त्यांनी सांगितले.
पूरपरिस्थितीत रस्ते किंवा पुलांवरून पाणी वाहत असल्यास त्या मार्गांवरील वाहतूक बंद करावी आणि पूर ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत करून रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करावी. सर्व शासकीय यंत्रणांचे ग्रामस्तरीय ते जिल्हास्तरीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपापल्या मुख्यालयी राहावे आणि कोणत्याही परिस्थितीत मुख्यालय सोडू नये. सर्व उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी यंत्रणांशी समन्वय आणि संनियंत्रण ठेवावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले.
लातूर, नांदेड आणि बिदर प्रशासनाची संयुक्त बैठक
उदगीर तालुक्यातील सीमावर्ती भागात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि कर्नाटकातील बिदर जिल्ह्याचे अपर जिल्हादंडाधिकारी यांच्यासह महसूल आणि पाटबंधारे विभागाची संयुक्त बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली. यावेळी तिन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाने परस्परांशी समन्वय ठेवण्याबाबत चर्चा केली. तसेच, तिन्ही जिल्ह्यांतील पावसाची सद्यस्थिती आणि प्रकल्पांतील पाण्याच्या पातळीबाबत आढावा घेण्यात आला.
उदगीर तालुक्यातील बोरगाव, धडकनाळ गावांतील 70 कुटुंबे सुरक्षित स्थळी
काल रात्रीच्या मुसळधार पावसामुळे उदगीर तालुक्यातील बोरगाव आणि धडकनाळ गावांचा संपर्क तुटला. येथील सुमारे 70 घरांमध्ये पुराचे पाणी शिरले, त्यामुळे या कुटुंबांतील 210 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. या गावांतील शेतजमिनी आणि पशुधनाचे नुकसान झाले असून, याचे पंचनामे तातडीने सुरू करण्यात आले आहेत. उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे आणि तहसीलदार राम बोरगावकर हे पहाटेपासून गावात उपस्थित असून, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत
