कुरेशी समाज व विविध संघटनांच्या वतीने सोमवारी लातुरात मूक मोर्चाचे आयोजन : अफजल कुरेशी
लातूर : शेतकरी, व्यापारी, कुरेशी यांच्यावर गोरक्षकांच्या माध्यमातून होणाऱ्या अन्याय – अत्याचाराच्या विरोधात कुरेशी समाजाने एक महिन्यापासून पशूंची खरेदी, विक्री , कटाई बंद केली आहे. समाजावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांना निवेदनेही देण्यात आली आहेत. कुरेशी समाजावर होणाऱ्या या अन्यायाचा निषेध करण्यासाठी सोमवार, दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी लातुरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अफजल कुरेशी, उपाध्यक्ष, ऑल इंडिया जमिअतुल कुरेश महाराष्ट्र राज्य यांनी शनिवारी लातुरात पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
मागच्या काही महिन्यांपासून लातूर जिल्ह्यात शेतकरी, कुरेशी समाज , व्यापारी, पशूंची वाहातून करणारे वाहन चालकांवर काही अतिउत्साही गुंड व तथाकथित गोरक्षक प्रशासकीय व राजकीय यंत्रणेच्या मदतीने अन्याय , अत्याचार करत आहेत. त्यामुळे कुरेशी समाजाने दि. २२ जुलै २०२५ पासून पशूंची खरेदी – विक्री, मांस विक्री जिल्हा व राज्यव्यापी बेमुदत बंद केली असा;याचे अफजल कुरेशी यांनी यावेळी बोलताना सांगितले. पशूंची वाहतूक करण्यासाठी परवाना नाही, पशूंचे फिटनेस प्रमाणपत्रच नाही अशा विविध कारणांवरून तथाकथित गावगुंडांकडून पशूंची होणारी वाहतूक अडवून प्रशासनाला हाताशी धरून पशु ताब्यात घेण्याचे प्रकार घडत आहेत. केवळ एवढेच नव्हे तर प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आलेले हे पशु पुन्हा जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असल्याचा प्रकारही घडत आहे. कुरेशी समाजाचा पारंपरिक व्यवसायच मांस विक्रीचा आहे. तरीही हा व्यवसाय करत असताना गोमातेचे रक्षण झालेच पाहिजे अशी आपल्या समाजाची भावना आहे. तसेच देशी गाईला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यात आला पाहिजे,अशीही आपलय समाजाची आग्रही मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे या व्यावसायिकांच्या शासनाकडे तथाकथित गोरक्षकांच्या नावाखाली गावगुंडांकडून होत असलेली जनावरांची वाहतूक अडविणे, कायदा हातात घेऊन लूटमार करणे, मारहाण करणे, मॉब लिचिंगद्वारे हत्या करणे आदी प्रकरणात कठोरात कठोर कार्यवाही करून प्रतिबंध करणे, सर्व गोशाळेंची उच्च स्तरीय चौकशी करणे, मुस्लिम खाटीक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणे, जनावरांच्या वाहतुकीसाठी वाहन कायद्यात बदल करणे, लातूर जिल्ह्यातील तालुका, नगर पालिका, ग्रामपंचायतच्या क्षेत्रात स्लॅटर हाऊसची निर्मिती करणे, शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य भाव देणे, पोलिसांमार्फत शेतकरी, व्यापारी, कुरेशी, वाहन चालक,यांच्यावर दाखल केलेले गुन्हे तात्काळ परत घ्यावेत, मोबा लीचिंगद्वारे हत्या झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना मोबदला द्यावा आदी मागण्यासाठी सोमवार, दि. १८ ऑगस्ट रोजी लातुरात अण्णाभाऊ साठे चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मुकमोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा दिला असल्याचे अफजल कुरेशी यांनी सांगितले.
यावेळी जमीअतुल कुरेशी कमिटी, लातूरचे जिल्हा अध्यक्ष हाजी इब्राहिम कुरेशी, उपाध्यक्ष फय्युम कुरेशी, सचिव अफसर कुरेशी, संविधान सेवा संघाच्या अध्यक्षा एड. शहेजादी शेख, उपाध्यक्ष एड. गोविंद सिरसाठ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधी आघाडीचेचे अध्यक्ष एड. विजय जाधव, इस्माईल कुरेशी, चांद कुरेशी, शफिक कुरेशी,जावेद कुरेशी यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
————–
