लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त
लातूर शहरात हजारो रुग्णांची मोफत तपासणी व उपचार
लातूर प्रतिनिधी,
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही
गुरुवार दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी लातूर शहर व जिल्ह्यातील विविध हॉस्पिटल्समध्ये
इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), डेंटल असोसिएशन, निमा (NIMA), होमिओपॅथी
असोसिएशन आणि विलासराव देशमुख फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात
आलेल्या विलासराव देशमुख महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात
हजारो रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले, तसेच त्यांना मोफत औषधींचेही
वितरण करण्यात आले.

डॉक्टरांकडून रुग्णांना मदतीचा हात
या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हॉस्पिटल्ससह
जिल्हाभरातील एकूण हॉस्पिटल्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी गरजू रुग्णांची सोय व्हावी यासाठी
शिबिराच्या आधीपासूनच रुग्णांना माहिती देण्याचे काम केले होते. शिबिराच्या दोन दिवस
आधीच उपचारासाठी आलेल्या ज्या रुग्णांचा खर्च अधिक होता, त्यांना लातूरच्या वैद्यकीय
क्षेत्रातील डॉक्टरांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते. यावरून लातूरच्या
वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वच डॉक्टरांच्या मनात लोकनेते विलासराव देशमुख
यांच्याप्रती किती आदराची भावना आहे, हे लक्षात येते. त्यांनी रुग्णांच्या आर्थिक
परिस्थितीचाही पदोपदी विचार केल्याचे दिसून आले.
या शिबिरात अस्थिरोग, दंत रोग, हृदयरोग, पोटाचे विकार, मधुमेह, नेत्रचिकित्सा,
रक्त तपासणी, एक्सरे, डिजिटल एक्सरे, इसीजी यांसह सर्वच व्याधींनी ग्रस्त असलेल्या
रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आल्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ. अभय कदम यांनी
सांगितले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी योगदान:
या महाआरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी आयएमए लातूरचे अध्यक्ष डॉ. अभय
कदम, आयएमए महिला विंग अध्यक्ष डॉ. ज्योती सूळ, डॉ. अशोक पोददार, डेंटल
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. लटूरिया, डॉ. साळुंके, निमाचे अध्यक्ष डॉ. मनोज देशमुख,
होमिओपॅथिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम दरक, डॉ. अशोक पाटील, डॉ. बालाजी
जाधव, डॉ. रमेश भाले, डॉ. अविनाश हरसुले, डॉ. प्रियंका वाघ, डॉ. दिनेश नवगिरे यांच्यासह
सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वतोपरी परिश्रम घेतले.
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या
महाआरोग्य शिबीरात दिवसभर उपचार सुरु होते. या दरम्यान या महाआरोग्य शिबीरात
सहभाग घेतलेल्या रुग्णालयास राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री
आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव
देशमुख, विलास साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई देशमुख, डॉ. सारिका देशमुख,
माजी आमदार विलास कारखान्याचे व्हा.चेअरमन वैजनाथराव शिंदे, जिल्हा काँग्रेस कमिटी
अध्यक्ष अभय सांळुके, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांच्यासह
विविध संस्थाचे पदाधिकारी स्मीता खानापूरे, अशोक गोविंदपूरकर, व्हा.चेअरमन अशोक
काळे, सपना किसवे, गणेश एसआर देशमुख, समद पटेल, प्रविण कांबळे, तबरेज तांबोळी,
संजय जगताप, समुख गोविंदपूरकर, सुंदर पाटील कव्हेकर, अमर राजपूत, विजय गायकवाड,
कैलास पाटील यांनी भेट देऊन उपक्रमाची माहीती घेतली.
‘लातूर पॅटर्न’चा गौरव:
डॉ. अशोक पोद्दार यांनी या शिबिराविषयी माहिती देताना सांगितले की, लातूर शहर
व जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट आरोग्य व्यवस्था उपलब्ध आहे, याचे सर्व श्रेय दिवंगत लोकनेते
विलासराव देशमुख यांच्या दूरदृष्टीला आहे. त्यांच्या विशेष प्रयत्न व सहकार्यामुळेच
वैद्यकीय क्षेत्रातही एक आगळावेगळा ‘लातूर पॅटर्न’ उदयास येऊ शकला आहे. शिबिराचा
लाभ घेतलेल्या अनेक रुग्णांनी, “विलासराव देशमुख हयात असतानाही त्यांनी सामान्यांची
काळजी घेतली आणि आज आपल्यात नसतानाही अशा उपक्रमांच्या माध्यमातून आपली
काळजी घेत आहेत,” अशा भावना व्यक्त केल्या.