अतिवृष्टीने झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, बॅरेजेस व
सिंचन प्रकल्पांच्या दरवाजांच्या मेंटेनन्ससाठी आकस्मित निधीमधून निधी उपलब्ध करून
द्यावा, जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजेभोसले यांच्याकडे
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची मागणी
लातूर प्रतिनिधी:
मागच्या दोन दिवसात लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप पिकांच्या
नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधारे,
बॅरेजेस, सिंचन प्रकल्पाचे गेट्स, आणि कॅनॉल दुरुस्तीसाठी जिल्ह्याच्या अकस्मित निधीमधून
निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख
यांनी, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे
भोसले यांच्याकडे केले आहे.
गुरुवारी रात्री आणि त्यानंतर सलगपणे लातूर जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी
झाली आहे. शेतातील सकल भागात पाणी साचून खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
त्याचबरोबर शेजारील धाराशिव, बीड जिल्ह्यातही मोठा पाऊस झाला असून त्यामुळे तेरणा,
मांजरा, तावरजा या नद्यांना पूर आला आहे. परिणामी शेतात पाणी घुसून शेतीचेही नुकसान
झाले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळण्याच्या दृष्टीने या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे
करावेत, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे.
लातूर नजीक तावरजा नदीवरील भुसनी बॅरेजेचे दरवाजे वेळेत उचलले गेले नाहीत
त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले होते, यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर आमदार
अमित देशमुख यांनी शुक्रवारी त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. अधिकाऱ्याशी चर्चा
केली असता या बॅरेजच्या दरवाजांचे मेन्टेनन्स वेळेत झाले नसल्याचे लक्षात आले. त्यांनी
अधिकची चौकशी केली असता या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचे कारण समोर
आले आहे, ही बाब माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
बंधारे , बॅरेजेसचे दरवाजे असोत की, सिंचन प्रकल्पाचे दरवाजे आणि कॅनल असोत याची
दुरुस्ती वेळेत आणि तातडीने होणे गरजेची आहे. अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे
या मेंटेनन्सच्या कामासाठी जिल्ह्याच्या अकस्मित निधीमधून तातडीने निधी उपलब्ध करून
द्यावा, अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले
यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही, हा विषय महत्त्वाचा असल्याने
आपण यात तातडीने लक्ष घालू आणि आवश्यक तिथे निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन
आमदार अमित देशमुख यांना दिले आहे.
