नागपूर : विधानसभेच्या अध्यक्षांसंदर्भात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामुळे विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निषेध करत आंदोलन केले. यावेळी जयंत पाटील से जो टकराएगा, करेक्ट कार्यक्रम हो जाएगा, अशा घोषणा देत निलंबनाच्या कारवाईचा निषेध करण्यात आला. या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. नवीन नेतृत्वाचा आवाज दाबण्यासाठी बहुमताच्या जोरावर सरकारने हा निर्णय घेतला आहे, अशी खरपूस टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केली.
जयंत पाटील यांना खांद्यावर उचलले
‘निर्लज्ज सरकारचा धिक्कार असो’, ‘जाएंगे जाएंगे खोकेवाले जाएंगे’, असे म्हणत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे सदस्यत्व निलंबित करण्याच्या कारवाईचा निषेध नोंदविला. यावेळी विरोधी पक्षातील आमदारांनी जयंत पाटील यांना खांद्यावर उचलले. जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात येत आहेत. यावेळी ‘जयंत पाटील से जो टकरायेगा, करेक्ट कार्यक्रम हो जायेगा’, तसेच ‘टप्प्यात आला, कार्यक्रम झाला’, अशा घोषणा जयंत पाटील यांच्या समर्थक आमदारांनी दिल्या.
निलंबनानंतर जयंत पाटील यांनी केले ट्विट
निलंबन झाल्यानंतर जयंत पाटील यांनी एक ट्विट केले. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘या निर्लज्ज ‘सरकार’ विरोधात लढत राहणार…बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय…’